मान्सून १ जूनपासून गोव्यात पोहोचण्याची शक्यता; २७ मेपर्यंत केरळमध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 12:36 IST2025-05-23T12:35:25+5:302025-05-23T12:36:12+5:30
अवकाळी पावसाचा जोर कायम

मान्सून १ जूनपासून गोव्यात पोहोचण्याची शक्यता; २७ मेपर्यंत केरळमध्ये दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या ताज्या अंदाजांनसार यंदा नैऋत्य मान्सून तब्बल ६ दिवस अगोदर केरळ किनारपट्टीला धडक देणार आहे तर १ जूनपर्यंत तो गोव्यात पोहोचण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या चक्रीय वाऱ्यामुळे हा बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. चक्रीयवाऱ्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढील ३-४ दिवसांत केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे. येत्या ३६ तासांत हा पट्टा जवळजवळ उत्तरेकडे सरकण्याची आणि आणखी तीव्रतेने डीप्रेशन तयार होण्याची अपेक्षा आहे. या बदलांमुळे गोव्यात १ जून रोजी पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मान्सूनपूर्व पावसाने राज्यात अनेक ठिकाणी मोठी पडझड घडविली असतानाच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळाची शक्यताही निर्माण झाली आहे. आपत्कालीन व्यवस्थापनाकडून खबरदारीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र बनत चालल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. मुरगांव बंदरासह समुद्रात इतर ठिकाणी असलेल्या बार्ज व मोठ्या बोटी सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मच्छीमारांनाही समुद्रात जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुरूवारी पावसाने थोडी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे.
राज्यातील पारंपरिक मच्छीमारांनी मासेमारी बंदीची वाट न पाहता आपल्या लहान होड्या सुरक्षित ठिकाणी नेल्या आहेत. एरव्ही मासेमारीनंतर त्या किनाऱ्याजवळच असतात. एका बाजूने अरबी समुद्रात हवामानाच्या वेगवान घडामोडी होतानाच बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा निर्माण होताना दिसत आहे.
दोन चक्रिवादळे
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्री पट्टयात तीव्र डिप्रेशन निर्माण होताना दिसत आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या दोन्ही सिस्टम्स चक्रिवादळापर्यंत पुढे गेल्यास एकाचवेळी दोन चक्रिवादळे उष्णकटिबंध क्षेत्रात घोंघावणार आहेत. त्यांचे 'पवन' आणि 'अंफन' असे नामकरण होऊ शकते.
पाच वाहनांवर पडले झाड
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कालही कायम होता. कळंगुट परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. खोब्रावाडो-बागा येथे झाडाच्या भल्या मोठ्या फांद्या पार्क केलेल्या पाच वाहनांवर पडून मोठे नुकसान झाले. उमटावडो येथे घराचे छप्पर उडाले.
माड पडून तीन वाहनांचे नुकसान
गुरुवारी सकाळी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसात इंदिरानगर-चिंबल येथील एमआरएफ शेडजवळील माड पार्क केलेल्या तीन वाहनांवर पडून मोठे नुकसान झाले. अग्निशामक दलाने त्वरित घटनास्थळी माड कापून बाजूला केले.