'मॉडेल ट्रायबल व्हिलेज' तयार करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 12:46 IST2025-11-16T12:44:41+5:302025-11-16T12:46:06+5:30
मडगाव येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस उत्साहात

'मॉडेल ट्रायबल व्हिलेज' तयार करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: सरकारची राज्यात मॉडेल ट्रायबल व्हिलेज तयार करण्याची संकल्पना असून जंगलाशी निगडीत व्यवसाय सुरू करण्यास वाव मिळावा त्यासाठी आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. येथील एसजीपीडीए मैदानावर आदिवासी कल्याण संचालनालय आणि आदिवासी संशोधन संस्था यांच्यावतीने भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आदिवासी कल्याणमंत्री तवडकर, सभापती डॉ. गणेश गावकर, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई आदी उपस्थित होते.
मंत्री तवडकर यांनी लिहिलेल्या 'बिरसाजींची ज्वाला' या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. याबद्दल त्यांचे मुख्यमंत्री सावंत यांनी अभिनंदन केले. बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार केलेल्या कलाकारांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री नाईक, सभापती गावकर यांनी विचा मांडले. १० टक्के बजेट ट्रायबलसाठी आहे ते योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचते काय, हे खात्याकडून तपासत जाते, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. या कार्यक्रमांच्या निमित्त पेडणे ते काणकोणपर्यंत सुमारे ८ हजाराहून अधिक दुचाकीस्वारांची रॅली काढण्यात आली. स्वागत मंत्री तवडकर यांनी केले.
'प्रलंबित 'वनहक्क' वर्षभरात मिळतील'
मुख्यमंत्री म्हणाले, की आतापर्यंत वनहक्क अधिकाराखाली आदिवासींचे सुमारे १० हजार अर्ज आले होते, त्यातील सुमारे ५ हजार अर्ज मंजुर करण्यात आले व त्यांना वनहक्क देण्यात आलेत. उर्वरित अर्ज पुढील वर्षभरात मंजुर केले जातील व हीच भगवान बिरसा मुंडा यांना खरी श्रध्दांजली ठरेल. फर्मागुडी येथे ट्रायबल म्युझियम उभारण्यात येणार असून त्याठिकाणी आदिवासी समाजातील स्वातंत्र्यसैनिकांची छायाचित्रे लावण्यात येतील.
'मुंडा यांचे कार्य प्रेरणा घेण्यासारखेच'
भगवान बिरसा मुंडा यांनी जल, जंगल व जमीन हे ब्रिद वाक्य घेऊन वयाच्या २५ व्या वर्षी ब्रिटिशांविरोधात लढाई केली. युवकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखे खूप आहे. त्यांचे कार्य, चरित्र लोकांसमोर यावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार उल्हास तुयेकर, दाजी साळकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, बंगळूरचे आमदार शांताराम सिध्दी, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, माजीमंत्री महादेव नाईक, माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, नरेंद्र सावईकर उपस्थित होते.