चक्क कचरापेटीत जमा केले जायचे बेकायदेशीर वसुलीचे पैसे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 16:52 IST2018-09-27T16:51:58+5:302018-09-27T16:52:06+5:30

गोवा-कर्नाटक सीमेवर असलेल्या काणकोणच्या पोळे चेक नाक्यावर आरटीओ एजंटांकडून परराज्यातील ट्रक चालकांकडून बेकायदेशीर पैशांची वसुली केली जाते

Misrepresentation money is being deposited in trash! | चक्क कचरापेटीत जमा केले जायचे बेकायदेशीर वसुलीचे पैसे!

चक्क कचरापेटीत जमा केले जायचे बेकायदेशीर वसुलीचे पैसे!

मडगाव: गोवा-कर्नाटक सीमेवर असलेल्या काणकोणच्या पोळे चेक नाक्यावर आरटीओ एजंटांकडून परराज्यातील ट्रक चालकांकडून बेकायदेशीर पैशांची वसुली केली जाते ही गोष्ट बुधवारी पहाटे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या छाप्यातून पुढे आलेली आहे. आता या भागातून या चेक नाक्यावरील भ्रष्टाचाराबद्दल वेगवेगळ्या सुरस अशा कथा पुढे येऊ लागल्या आहेत. ट्रक चालकांकडून वसुल केले जाणारे हे पैसे चक्क कचरापेटीत ठेवले जात होते, अशी माहिती पुढे आली आहे.

भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या बुधवारच्या छाप्यात या चेक नाक्यावरील आरटीओ इन्स्पेक्टर वामन प्रभू तसेच दोन एजंट जितेंद्र वेळीप व बसवराज गुरजवार उर्फ छोटू या तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडून 16,500 रुपये जप्त करण्यात आले होते. या घटनेमुळे हा चेक नाका पुन्हा एकदा चर्चेत आला होता. यापूर्वीही या चेक नाक्यावर एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आरटीओचे अधिकारी अतिरिक्त पैसे घेत असताना रंगेहात पकडले गेले होते. या प्रकरणात एका निरीक्षकाला निलंबितही करण्यात आले होते. त्यावेळी ट्रक चालकांकडून अतिरिक्त रक्कम नाक्यातच घेतली जात होती.

मिळत असलेल्या माहितीप्रमाणे, या घटनेनंतर या चेक नाक्यावरील पैसे घेण्याची पद्धत बदलली गेली. या चेक नाक्यावर ट्रक चालकांना अधिकृत रकमेचीच पावती फाडली जात होती. मात्र वरचे पैसे बाहेर असलेले एजंट स्वत: घेत होते. दर दिवशी अशा वाममार्गाने एकत्र केलेली ही रक्कम लाख-दीड लाखांच्या आसपास जमत होती, अशीही माहिती प्राप्त झाली आहे. एसीबीने बुधवारी अटक केलेला जितेंद्र वेळीप हा एजंट जवळच असलेल्या हॉर्टिकल्चर आस्थापनात सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता.

ट्रक चालकांकडून अतिरिक्त पैसे घेण्याचे काम तोच करत असे. त्यानंतर प्रत्येक दोन तासांनी त्याच्याकडे जमा झालेली रक्कम माजाळी कारवार येथे रहाणारा बसवराज आपल्या ताब्यात घ्यायचा आणि ही रक्कम तो आपल्या घरी नेऊन ठेवायचा. मिळत असलेली माहिती अशी की, मोठय़ा प्रमाणावर जमा केलेली ही बेकायदेशीर रक्कम स्वत:कडे सापडू नये यासाठी जवळच असलेल्या कचरा पेटीत हे पैसे ठेवले जायचे. एसीबीने जेव्हा छापा टाकला त्यावेळी जितेंद्र याच्याकडे 15,940 रुपये तर बसवराज याच्याकडे 710 रुपये सापडले होते.
याशिवाय बसवराजने आपल्या खोलीवर त्यापूर्वीच जवळपास एक लाखाची रक्कम नेऊन ठेवली होती अशीही माहिती प्राप्त झाली आहे. मात्र त्याचे घर कर्नाटक राज्याच्या हद्दीत असल्यामुळे एसीबीने त्या घरावर छापा टाकला नव्हता.

पोळेचा चेक नाका हा गोव्यातील प्रमूख चेक नाक्यांपैकी एक असून या नाक्यावरून कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश व तामिळनाडू या चार मुख्य राज्यांतून माल वाहतूक केली जाते. परराज्यातील या ट्रक चालकांकडे त्यांच्या भाषेत बोलता यावे यासाठी मुद्दामहून कर्नाटकातील किंवा अन्य दक्षिण भारतीय राज्यातील एजंटांचा यासाठी उपयोग करुन घेतला जात होता. बसवराज याला एजंट करण्यामागेही हेच कारण असल्याचे सांगितले जाते.

या चेक नाक्यावरुन दर दिवशी शंभर ते दीडशे ट्रकांची वाहतूक होते. यात बहुतेक मासळी घेऊन येणा:या ट्रकांचा समावेश असतो. यातील काही ट्रक फिशमिलसाठी मासे आणत असतात. हा व्यवहार बहुतेकवेळा बेकायदेशीर असतो. त्यामुळेच असे ट्रकचालक या एजंटांच्या तावडीत आयतेच सापडायचे. त्याशिवाय याच चेक नाक्यावरुन बेकायदेशीर रेती वाहून नेणारी वाहनेही गोव्यात शिरत असतात. या वाहनांच्या चालकांकडूनही बेकायदेशीर हप्ते वसुल केले जायचे. दर महिन्याला ही वसुली 30 ते 35 लाखांच्या घरात जाऊ शकते अशी अनधिकृत माहिती मिळाली आहे. हे पैसे नेमके कुणार्पयत पोचायचे हे शोधून काढण्याचे आव्हान आता एसीबीसमोर उभे राहिले आहे.

 

Web Title: Misrepresentation money is being deposited in trash!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.