सुलेमानला सोडण्यात मंत्री, आमदारांचा हात! काँग्रेस, आपचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2024 13:32 IST2024-12-17T13:30:56+5:302024-12-17T13:32:05+5:30

डीजीपींची घेतली भेट; पलायन प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी

ministers mlas involved in suleman release congress aap alleges | सुलेमानला सोडण्यात मंत्री, आमदारांचा हात! काँग्रेस, आपचा आरोप

सुलेमानला सोडण्यात मंत्री, आमदारांचा हात! काँग्रेस, आपचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भू-बळकाव प्रकरणातील कोठडीतून पळालेला सिद्दिकी उर्फ सुलेमान खान याने नावे घेतलेल्या सर्व पोलिसांना त्वरित निलंबित करून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या प्रकरणात सरकारमधील काही मंत्री, आमदार गुंतले असल्याने त्यांच्या आदेशावरूनच सुलेमानला पळवल्याची टीकाही काँग्रेसने केली आहे.

पणजी येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, सुलेमान याने व्हिडीओमध्ये खळबळजनक आरोप केले आहेत. १२ पोलिसांनी आपल्याला पळून जाण्यास मदत केल्याचेही तो म्हणतोय, यातील काही जणांची नावेही त्याने घेतली आहेत. या सर्वांना आधी निलंबित करावे. तसेच आमदाराने धमकी देऊन जमीन हस्तांतरित करण्यास सांगितल्याचा आरोपही सुलेमान याने केला आहे. एकूणच या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी.

युरी आलेमाव पुढे म्हणाले की, बडतर्फ करण्यात आलेला आयआरबीचा कॉन्स्टेबल अमित नाईक याला तीन कोटी रुपयांची ऑफर कोणी दिली? ज्या मोटरसायकलवरून सुलेमानला त्याने पळवले ती मोटरसायकल कुठे आहे? रायबंदर येथील कोठडीतून पळाल्यानंतर हद्दीवर पोहचेपर्यंत पुरेसा वेळ होता. तोपर्यंत पोलिसांनी हालचाली का केल्या नाहीत? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

आमदार एल्टन डिकॉस्टा म्हणाले की, हे सरकार केवळ विरोधकांच्या मागेच पोलिस लावते आणि गुन्हेगारांना मोकाट सोडले जाते.

ईडी, पोलीस, दक्षता अधिकारी विरोधकांना छळण्यासाठी वापरले जातात. भू-बळकाव प्रकरणात जे काही बाहेर आले आहे ते केवळ हिमनगाचे टोक आहे. यापेक्षाही अनेक गोष्टी आता बाहेर येणार आहेत, असेही युरी आलेमाव म्हणाले.

सुलेमान गोव्यातून बाहेर पळून गेला तेव्हा हद्दीवरील पोलिस काय करत होते?. लोकांचा पोलिस यंत्रणेवरील विश्वास उडालेला आहे. या प्रकरणात उपसभापतीच नव्हे तर अन्य आमदार, मंत्रीही असू शकतात. त्यामुळे संपूर्ण न्यायालयीन चौकशीची गरज आहे, असेही पाटकर म्हणाले.

बडतर्फ कॉन्स्टेबल अमित नाईक सरकारी आशीर्वाद असल्याशिवाय एवढे धाडस करणार नाही. सुलेमानच्या पलायनामागे राजकारण्यांचा हात असून पोलिसांशी हातमिळवणी करून व योग्य कारस्थान रचून त्याला कोठडीतून बाहेर काढण्यात आले आहे. सरकारला जर हे प्रकरण तडीस न्यायचे असेल तर सीबीआयद्वारे तपास करावा, असे आमदार अॅल्टन डिकॉस्टा म्हणाले.

काँग्रेस, आपचे नेते डीजीपींना भेटले

सुलेमान खान याने ज्या दिवशी गुन्हा अन्वेषण विभागाच्या कोठडीतून पलायन केले, त्या दिवसाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज जारी करावेत, अशी मागणी आम आदमी पक्ष व काँग्रेसने गोवा पोलिस महासंचालक अलोक कुमार यांच्याकडे केली आहे. सोमवारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पणजी पोलिस मुख्यालयात त्यांची भेट घेतली. कोठडीतून बाहेर पडण्यासाठी आपणाला गुन्हा अन्वेषण विभागाच्या उच्च पदावरील पोलिस अधिकाऱ्याने मदत केल्याचा दावा सुलेमान याने केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या या अधिकाऱ्यांना बदलून दुसऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

'फिनेल' कोणी दिले 

सुलेमान पलायन प्रकरणात पोलिसांच्या अटकेत असलेल्या अमित नाईक याने फिनेल घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला फिनेल कुणी दिले? त्याने खरेच आत्महत्येचा प्रयत्न केला की, त्याचा कोणी काटा काढण्याचा प्रयत्न केला? या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशीही मागणी काँग्रेसचे नेते सुनील कवठणकर यांनी केली आहे.

युरी म्हणतात... 

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, पोलिस, राजकारणी व गुन्हेगार यांच्यातील संगनमत पुन्हा एकदा उघड झाले आहे. केवळ एकच आमदार नव्हे, तर अन्य काही सत्ताधारी आमदार, मंत्री भू-बळकाव व्यवहारांमध्ये गुंतलेले असावेत. गोव्यात गुंडाराज चालू आहे की काय? असे वाटण्यासारख्या घटना घडत आहेत. राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय असे प्रकार घडूच शकत नाहीत.

कायदा-सुव्यवस्था कोलमडली : वीरेश 

राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. सुलेमानसारखे गुन्हेगार पोलिस कोठडीतून पलायन करतात, हे यावरून सरकारी यंत्रणा कोणाच्या बाजूने आहे हे दिसून येत आहे. या प्रकरणात सुलेमानने पोलिसांसह सत्ताधारी मंडळींतील काही जणांकडे बोट केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी केली.

सखोल चौकशी करा : कामत 

सुलेमान कारागृहातून पळून जाण्यास राज्यातील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था आहे. घडलेले हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निवृत्त न्यायाधीशांमार्फत व्हायला हवी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते जितेश कामत यांनी केली आहे.

सीबीआयकडे प्रकरण देणे गरजेचे : विजय भिके 

सुलेमान कारागृहातून फरार प्रकरणात काही पोलिसांची तसेच आमदार, मंत्र्यांचे नाव समोर आल्याने या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करावी, अशी मागणी काँग्रेसचे महासचिव विजय भिके यांनी केली आहे. म्हापसा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उत्तर गोवा अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, नौशाद चौधरी, नगरसेवक शशांक नार्वेकर, परेश पानकर, नगरसेवक सुधीर कांदोळकर, चंदन मांद्रेकर आदी उपस्थित होते.

योग्य यंत्रणाच्या हाती प्रकरण द्या : शंकर पोळजी 

महाघोटाळेबाज सुलेमान याने आपणाला पोलिसांच्या पथकाने हुबळीपर्यंत जाण्यास मदत केल्याचा दावा केला आहे. यातून राज्यातील पोलिस यंत्रणा किती भ्रष्टाचारी झाली आहे हे दिसून येते. त्यामुळे या प्रकरणाची योग्य यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी व्हायला हवी. एकीकडे नोकरीकांड गाजत असताना आता सुलेमानच्या पलायन प्रकरणावरून सरकार गोमंतकीयांविषयी किती गंभीर आहे हे दिसून येत असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी केली आहे.
 

Web Title: ministers mlas involved in suleman release congress aap alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.