कुर्टीतील जखमींची मंत्री रवी नाईक यांच्याकडून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 09:45 IST2025-05-04T09:45:47+5:302025-05-04T09:45:59+5:30
याची माहिती मिळताच फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांची चौकशी केली.

कुर्टीतील जखमींची मंत्री रवी नाईक यांच्याकडून चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : शिरगाव येथील लहराई देवीच्या जत्रेत शनिवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत जखमी झालेल्या तिघांना फोंडा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. याची माहिती मिळताच फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांची चौकशी केली.
या दुर्घटनेत जखमी झालेला गंगाराम झोरे (२५) हा गंभीर जखमी झाला आहे; तर भैरू झोरे (३३), लक्ष्मण धाकू शिंदे (१९) हे तिघेही महाळशे कुर्टी येथील रहिवासी आहेत. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना हॉस्पिटलमधून पुरेपूर मदत करावी व आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध कराव्यात, अशा सूचना मंत्री नाईक यांनी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी मंत्री नाईक यांनी चेंगराचेंगरीत ज्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला, त्याबद्दल शोक व्यक्त केला. तसेच जखमी झालेले सर्व भक्तगण लवकर बरे व्हावेत, अशी आशा व्यक्त केली. सध्या उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये गंगाराम झोरे हा जखमी असल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहेत, तर इतरांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.
जमात-ए-इस्लामी हिंदकडून शोक व्यक्त
शिरगाव येथे लईराई देवीच्या यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत सहा भाविकांचा मृत्यू झाला, तर ७० पेक्षा अधिक जखमी झाले. या पार्श्वभूमीवर जमात-ए-इस्लामी हिंद, गोवा शाखेने तीव्र दुःख व्यक्त केले आहे. सोबतच या दुर्घटनेची तात्काळ व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. 'या हृदयद्रावक घटनेने आम्ही व्यथित झालो आहोत. मृतांच्या कुटुंबीयांप्रति आमची सहवेदना असून, जखमींना लवकरात लवकर पूर्ण बरे होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो, असे जमातचे गोवा अध्यक्ष असीफ हुसेन यांनी म्हटले. सरकारने मृत व जखर्मीच्या कुटुंबांना त्वरित मदत व नुकसानभरपाई द्यावी तसेच भविष्यातील धार्मिक समारंभासाठी सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
चेंगराचेंगरी झाल्यानंतर डिचोली आरोग्य केंद्रात सर्व जखमींना नेण्यात आले. पण, तिथे केवळ एक डॉक्टर कार्यरत होत्या. अचानक ५० जण जखमी स्थितीत तिथे आल्याने त्यादेखील गडबडल्या. मोठी जत्रा असल्याने निदान जवळच्या आरोग्य केंद्रात विशेष सुविधा तयार करणे, डॉक्टर्स उपलब्ध करणे हे झाले पाहिजे होते, जे झाले नाही. - जखर्मीचा नातेवाईक
चेंगराचेंगरीच्या घटनेत ज्या भाविकांचा बळी गेला त्यांच्याप्रती दुःख आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर येणार आहे. जखमी भाविकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी गोमेकॉसह इतर इस्पितळात तातडीने आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जात आहेत. - सदानंद तानावडे, राज्यसभा, खासदार
गेली अनेक वर्षे आम्ही शिरगाव जत्रोत्सवात जात आहोत. पण असा अनुसूचित प्रकार कधीच घडला नव्हता. मागील काही वर्षांपासून गर्दीमुळे धक्काबुक्की होण्याचे प्रकार वाढले आहे. काही भाविक तसेच धोंडही मस्ती करतात. त्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो. त्यामुळे जर आता शिरगावच्या जत्रेत होमकुंडच्या रात्रीची गर्दी कमी करायला हवी तर फक्त धोंडांना प्रवेश द्यावा. भाविकांना पुढील पाच दिवस कौलांसाठी दर्शनाला प्रवेश द्यावा. - रामदास सावंत, मये