मंत्री हळर्णकर धक्काबुक्की प्रकरण, संशयित गौरव बक्षी याला जामीन मंजूर
By काशिराम म्हांबरे | Updated: July 12, 2024 16:27 IST2024-07-12T16:26:16+5:302024-07-12T16:27:04+5:30
बुधवारी संध्याकाळी हा प्रकार थिवी मतदार संघातील रेवोडा येथील पंचायत कार्यालया नजीक घडला होता.

मंत्री हळर्णकर धक्काबुक्की प्रकरण, संशयित गौरव बक्षी याला जामीन मंजूर
म्हापसा: मच्छीमार मंत्री निळकंठ हळर्णकर यांचे वाहन अडवून त्यांच्याशी वाद घालतल्या प्रकरणाच्या आरोपावरून कोलवाळ पोलिसांनी अटक केलेल्या दिल्ली स्थित बिल्डर, सामाजीक कार्यकर्ता गौरव बक्षी याला म्हापसातील प्रथम वर्ग न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
बुधवारी संध्याकाळी हा प्रकार थिवी मतदार संघातील रेवोडा येथील पंचायत कार्यालया नजीक घडला होता. हळर्णकर हे झाडांच्या वाटपासाठी पंचायत कार्यालयात गेले असता त्यांनी आपली गाडी कार्यालया समोर रस्त्यावर पार्क केली होती. त्याच दरम्यान तेथे मंत्र्यांच्या गाडी समोर आपली गाडी पार्क केलेल्या बक्षी यांना गाडी हटवण्याची सुचना हळर्णकरांच्या चालकांने केली होती. यावरून वादाला आरंभ झालेला. त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी बक्षी याला कोलवाळ पोलिसांकडून अटक करण्यात आलेली.
अटक करण्यात आलेल्या बक्षी यांनी नंतर जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलेला. दाखल केलेल्या अर्जावर सकाळच्या पहिल्या सत्रात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल दुसऱ्या सत्रासाठी राखून ठेवला होता. बक्षी यांना १५ हजार रुपयांच्या वैयक्तीक हमीवर तसेच तेवढ्याच रक्कमेच्या हमीदारावर जामीन मंजूर केला आहे. पुढील आठवडाभर त्यांना कोलवाळ पोलीस स्थानकावर हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील २ महिने रेवोडा पंचायतीत जाण्यास मनाई करणारा आदेश न्यायालयाकडून दिला आहे.