मंत्री गोविंद गावडे अडचणीत, पद धोक्यात; आदिवासी कल्याण खात्यावरील आरोपामुळे मुख्यमंत्रीही संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 06:59 IST2025-05-27T06:58:14+5:302025-05-27T06:59:14+5:30

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणतात, आता कारवाई करणारच!

minister govind gawde in trouble position in danger cm pramod sawant also angered by allegations against tribal welfare department | मंत्री गोविंद गावडे अडचणीत, पद धोक्यात; आदिवासी कल्याण खात्यावरील आरोपामुळे मुख्यमंत्रीही संतापले

मंत्री गोविंद गावडे अडचणीत, पद धोक्यात; आदिवासी कल्याण खात्यावरील आरोपामुळे मुख्यमंत्रीही संतापले

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मंत्री गोविंद गावडे यांनी परवा फॉड्यातील कार्यक्रमावेळी आदिवासी कल्याण खात्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केल्याने भाजपचे सर्वच नेते संतापले आहेत. कंत्राटदारांच्या फाईल्स मंजूर करण्यासाठी आदिवासी खात्याकडून काही तरी घेतले जाते, असे जाहीरपणे गावडे यांनी म्हटल्याने मुख्यमंत्री सावंतही प्रथमच संतापले आहेत. गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाईल की काय याबाबत पुढील चार दिवसांत निर्णय होईल, अशी माहिती मिळाली. गावडे यांचे मंत्रिपद जाऊ शकते, असे भाजपमधील काहीजणांना वाटते. एकूण विषय दिल्लीत पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचला आहे.

गावडेंच्या वक्तव्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री गावडे यांची बेशिस्त मी खपवून घेणार नाही, कारवाई होईलच, असे नाईक यांनी काल 'लोकमत'ला सांगितले. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे. मंत्री गोविंद गावडे हे जे काही बोलले ते पक्षाच्या शिस्तीला शोभणारे नाही. प्रत्येकवेळी असली वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत. याबद्दल मंत्र्यावर कारवाई केली जाईल, हे निश्चित असेही नाईक म्हणाले. प्रत्येक गोष्ट बोलण्यासाठी वेगळे व्यासपीठ असते. सगळ्याच गोष्टी जाहीरपणे बोलायच्या नसतात. 'उचलली जीभ लावली टाळ्याला', असे प्रत्येकवेळी चालणार नाही, असेही दामू नाईक म्हणाले. गावडे यांनी आदिवासी कल्याण खाते बंदच करा, ते खाते काहीतरी घेऊन कंत्राटदारांच्या फाईल मंजूर करते, असा आरोप केला होता. 

सरकारची इमेज डागाळली

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या कोअर टीम बैठकीवेळी पक्षाने मुख्यमंत्री सावंत यांना सांगितले होते की तुम्ही गोविंद गावडे यांच्याकडून कलाअकादमीचे चेअरमनपद काढून घ्या. त्यावर मुख्यमंत्री सावंत यांनी एकदा निवडणूक झाली की लगेच काढून घेतो, असे काही पदाधिकाऱ्यांना सांगितले होते पण तसे काही घडले नाही. मुख्यमंत्र्यांनी कायम नरमाईची व सांभाळून घेण्याची भूमिका घेतली होती. सरकारवर कधी पांडुरंग मडकईकर तर कधी गोविंद गावडे वगैरे भ्रष्टाराचाराचे आरोप करू लागल्याने सरकारची इमेजच अडचणीत आल्याचे विरोधी आप, काँग्रेस हे पक्ष सोशल मीडियावरून दाखवून देऊ लागले आहेत. मंत्री गावडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात असलेल्या खात्यावर गंभीर आरोप केल्याने खळबळ माजली व दिल्लीत पक्षश्रेष्ठींपर्यंत कालच सगळा विषय पोहोचला.

'कोअर टीम'मध्ये नाराजी

सध्या मंत्रिमंडळात बदल करण्याच्या चर्चा असतानाच गावडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्यावर नेमकी कोणती कारवाई केली जाईल, याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिलेली नाही. तर भाजपची कोअर टीमही गावडे यांच्या बेछूट वक्तव्यावर कमालीची नाराज झाली आहे. त्यामुळे गावडे यांच्यावर कारवाईचा रेटा कोरअ टीम कडूनही लावला जात आहे.

आता अति झाले....

मुख्यमंत्री सावंत यांनी गावडे यांना कायम आपुलकीने सांभाळून घेतले. गावडे यांना मुख्यमंत्र्यांनी कधी दुखवले नाही. कला अकादमीच्या विषयावरून आंदोलन झाले. भाजप कोअर टीमचे महत्त्वाचे सदस्य गावडे यांच्यावर नाराज होते, दिल्लीपर्यंत तक्रारी गेल्या होत्या. पण गावडे यांचे मंत्रिपद कायम सुरक्षित राहिले. थेट मुख्यमंत्र्यांच्याच खात्यावर परवा गावडे यांनी टीका केल्याने आता मात्र अति झाले, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांचे समर्थक आमदार व्यक्त करत आहेत.

मंत्री गावडे गोव्याबाहेर...

मंत्री गोविंद गावडे हे गोव्याबाहेर गेले आहेत. ते येत्या ३० रोजी गोव्यात परततील. त्यावेळी मुख्यमंत्री सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे त्यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतरच पुढील कारवाई काय असेल? हे स्पष्ट होईल. गावडे यांना मंत्रिमंडळातून काढावे असे भाजपला वाटत असले तरी मुख्यमंत्र्यांना तसे वाटत नाही, अशी चर्चा काही आमदारांमध्ये सध्या सुरू आहे.

बेजबाबदार वक्तव्य, कारवाई होणार : मुख्यमंत्री

कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केलेल्या वक्तव्याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, जबाबदार मंत्र्यांनी अत्यंत बेजबाबदार वक्तव्य केले आहे, असे वक्तव्य मंत्र्यांनी करू नये. यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. कोणती कारवाई होणार आणि या वक्तव्यावर केंद्रीय नेत्यांशी चर्चा केली आहात काय? असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, मी सर्व काही एका वाक्यात सांगून टाकले आहे. तुम्हाला काय ते कळायला हवे. यावर अधिक मी बोलणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांशी बोलायला हवे होते : सभापती तवडकर

आदिवासी कल्याण खात्याची कामे जर होत नाहीत तर मुख्यमंत्र्यांना सांगून कामे मार्गी लावणे ही संबंधित मंत्र्याची जबाबदारी असते. मंत्री गोविंद गावडे यांनी कामे होत नसतील तर मुख्यमंत्र्यांशी बोलायला हवे होते, असे मत सभापती रमेश तवडकर यांनी व्यक्त केले. मंत्री गोविंद गावडे यांनी आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावरून सरकारविरोधात केलेल्या वक्तव्याची धग वाढू लागली आहे. गावडेंच्या विधानाचा संदर्भ देत आता विरोधकांनीही नारया सदर देत आता करण्यास सुरुवात केली आहे. मी जेव्हा या खात्याचा मंत्री होतो तेव्हा कुठेतरी छोट्याशा जागी त्यांचे कार्यालय होते. परंतु तिथून ते मोठ्या इमारतीत नेण्यापासून त्यात आवश्यक प्रमाणात कर्मचारी नियुक्ती करण्यापर्यंत सर्व कामे आपण तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे पाठपुरावा करून मार्गी लावली, असेही तवडकर यांनी सांगितले.

कारवाई होणारच आहे. मी मुख्यमंत्री सावंत आणि पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांशीही बोललो आहे. पूर्वी एकदा आम्ही गावडे यांना समज दिली होती. आता अति झाले. मी बेशिस्त खपवून घेणार नाही? - दामू नाईक, प्रदेशाध्यक्ष, भाजप.

गावडे यांनी केलेले वक्तव्य आक्षेपार्ह आहे. ते स्वतः सरकारचाच भाग असताना आदिवासी कल्याण खात्याविषयी ते बेजबाबदारपणे व चुकीचे बोलले. अशी वक्तव्ये मंत्र्यांनी करू नयेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणे गरजेचे होते. - सदानंद तानावडे, राजसभा खासदार.

गावडे यांनी भ्रष्टाचार आणि आदिवासी समाजावर होणार्‍या अन्यायावर प्रकाश टाकला आहे. आदिवासी कल्याण खात्यातील कंत्राटदारांना फाईल मंजुरीसाठी पैसे देण्यास भाग पाडले जात असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे हे खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे. - गिरीश चोडणकर, काँग्रेस

भाजपचे मंत्री आणि आमदार हे भ्रष्टाचारात गुंतल्याचे खुद्द मंत्र्यांने जाहीर केले आहे. आदिवासी समाजाच्या हक्काचे आदिवासी भवन उभारण्याचे सोडून सरकार टॉवर्स उभारून कोट्यवधी रुपये उधळत आहे. मंत्री गावडे यांच्यामुळे भाजप सरकारचे बिंग फुटले आहे. - अमित पाटकर, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस

सरकारने अगोदर सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, गरीब जनतेला टार्गेट करून विकासाच्या नावाने त्यांची घरे मोडू नयेत. सध्या राजकीय कलहातून जनतेला मूर्ख बनविण्याचा उद्योग सुरू आहे. - सिसिल रॉड्रिग्स, आप
 

Web Title: minister govind gawde in trouble position in danger cm pramod sawant also angered by allegations against tribal welfare department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.