गाईला वाचविण्याच्या नादात मिनीबस पलटी; २० प्रवासी जखमी, दोघे गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 16:30 IST2023-10-24T16:30:11+5:302023-10-24T16:30:58+5:30
२० प्रवासी जखमी : दोघे गंभीर; धारबांदोडा येथील घटना

गाईला वाचविण्याच्या नादात मिनीबस पलटी; २० प्रवासी जखमी, दोघे गंभीर
अजय बुवा
फोंडा-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच भटकी गुरे ठाण मांडून बसलेले असतात. अनेकदा ही गुरे अपघाताचे कारणही बनत आहेत. काल, मंगळवारी या भटक्या गुरांना चुकवण्याच्या नादात पर्यटकांना घेऊन आलेली मिनीबस रस्त्याच्या बाजूला पलटली. या अपघातात बसमधील २० प्रवासी जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, हैदराबाद येथील मिनीबस पर्यटकांना घेऊन गोव्यात आली होती. सोमवारी सकाळी बंगळुरू येथे परत जात असताना थातोड-धारबांदोडा येथे अचानक काही गुरे राष्ट्रीय महामार्गावर आली. त्यातील एका गाईला वाचवण्याच्या नादात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी थेट डाव्या बाजूला कलंडली. यावेळी मिनीबसमध्ये २० प्रवासी होते. यातील जिनी जॉय, तमय सेबेस्तियान, किरण कुमार, एसले जॉन, आर राहुल, कॅटरिना, ईसा बिलबंट, एलीन जाॅन, मॅथ्यू के. एस हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मडगाव येथील अपोलो रुग्णालयात उपचार चालू आहेत. ११ जण किरकोळ जखमी इतर नऊपैकी दोन गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
‘त्या’ घटनेची आठवण
दोन आठवड्यांपूर्वी याच भागात हैदराबाद येथील पर्यटकांना घेऊन जाणारी बस उलटली होती. त्याच ठिकाणी एक किलोमीटर अंतरावर पुन्हा हा अपघात झाला आहे. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच कुळे पोलिस स्थानकाचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमी पर्यटकांना इस्पितळात नेण्यासाठी कार्यवाही केली.
भटक्या गुरांना चुकविण्याच्या नादात पलटी झालेली मिनीबस.