...तर डिसेंबरमध्ये खाणी बंद!
By Admin | Updated: October 14, 2015 01:31 IST2015-10-14T01:31:09+5:302015-10-14T01:31:19+5:30
पणजी : नव्याने सुरू झालेला राज्यातील खनिज खाण व्यवसाय हळूहळू वेग घेत आहे; पण टाकाऊ खनिज माल लिज क्षेत्राबाहेर टाकण्याच्या विषयाबाबत केंद्र सरकारने कायदेशीर

...तर डिसेंबरमध्ये खाणी बंद!
पणजी : नव्याने सुरू झालेला राज्यातील खनिज खाण व्यवसाय हळूहळू वेग घेत आहे; पण टाकाऊ खनिज माल लिज क्षेत्राबाहेर टाकण्याच्या विषयाबाबत केंद्र सरकारने कायदेशीर तोडगा काढला नाही, तर सुरू झालेल्या खाणी येत्या डिसेंबरमध्ये पुन्हा बंद होऊ शकतात, अशी भीती खनिज व्यावसायिकांना सतावत आहे.
तीन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत सर्व खनिज कंपन्या लिज क्षेत्राबाहेर टाकाऊ खनिज माल टाकत होत्या. मात्र, तशी पद्धत आता बेकायदा ठरते. त्यामुळे लिज क्षेत्राबाहेर ‘रिजेक्ट्स’ टाकता येत नाही. सध्या सेसा गोवा व अन्य काही कंपन्यांनी खनिज व्यवसाय नव्याने सुरू केला आहे; पण जो टाकाऊ खनिज माल असतो, तो ठेवावा कुठे, असा प्रश्न कंपन्यांसमोर निर्माण झाला आहे. सध्या कमी प्रमाणात माल असल्याने तो लिज क्षेत्रातच ठेवला जातो; पण डिसेंबरनंतर टाकाऊ खनिज मालाचे प्रमाण खूप होईल व त्या वेळी लिज क्षेत्राबाहेर जर हा माल ठेवण्यास मुभा मिळाली नाही, तर सुरू झालेल्या खनिज खाणी बंद करण्याची वेळ येऊ शकते, असे काही व्यावसायिकांनी सांगितले.
सेसा गोवा कंपनीने आपल्या दहा लिज क्षेत्रांमध्ये खाण व्यवसाय सुरू केला आहे. सुर्ल-साखळी, डिचोली, कोडली अशा ठिकाणी ही लिज क्षेत्रे आहेत. शिवाय सोनशी येथील खाणही सेसाकडूनच चालविली जाते. अन्य कंपन्यांनीही आता प्रत्यक्ष उत्खनन सुरू केले आहे. लिज क्षेत्राबाहेर डंप टाकता यावेत म्हणून केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्ती करावी व त्यासाठी वटहुकूम जारी करावा, अशा मागण्या काही खनिज व्यावसायिकांनी यापूर्वी केल्या आहेत.
(खास प्रतिनिधी)