दिल्लीत गाठीभेटी; गोव्यात हलचल, विश्वजीत राणे हे अमित शाह यांना भेटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 08:34 IST2025-03-28T08:33:30+5:302025-03-28T08:34:05+5:30

दामू नाईक व बी. एल. संतोष यांच्यात चर्चा

meeting in delhi but uproar in goa vishwajit rane meets amit shah | दिल्लीत गाठीभेटी; गोव्यात हलचल, विश्वजीत राणे हे अमित शाह यांना भेटले

दिल्लीत गाठीभेटी; गोव्यात हलचल, विश्वजीत राणे हे अमित शाह यांना भेटले

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची दिल्लीत भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली. मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर मंत्री विश्वजीत राणेही दिल्लीत असून त्यांनी गृहमंत्री अमित शाह व बी. एल. संतोष यांची भेट घेतली. यामुळे राज्यातील मंत्रिमंडळातील बदलाविषयी चर्चेला पुन्हा ऊत आला आहे.

दामू गेले दोन दिवस दिल्लीत आहेत. बुधवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. संतोष यांनी गोव्यातील राजकीय परिस्थितीबद्दल दामू यांच्याकडून जाणून घेतले. यापूर्वी ते गोवा भेटीवर आले असता दामू यांनी मंत्रिमंडळ फेररचनेबाबत आपली भूमिका त्यांच्याकडे स्पष्ट केली होती. आज बैठकीत पुन्हा या विषयावर सखोल चर्चा झाली.

दरम्यान, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे हेही दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली व नंतर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनाही ते भेटले. दोघांकडे त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. गोव्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन काल बुधवारीच पार पडले आहे. भाजपचे केंद्रीय नेतृत्व सरकारच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गेल्या सहा वर्षांत यशस्वी कामगिरी बजावलेली आहे.

दरम्यान, सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार पुढील महिन्यात मंत्रिमंडळातून चार जणांना डच्चू दिला जाण्याची तसेच सर्व मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल केला जाण्याची शक्यता आहे. पुढील दोन-तीन दिवसात गोव्यातून आणखी काही मंत्री, आमदारांनाही दिल्लीत पाचारण केले जाण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळात बदल होणार असा बोलबाला गेली अनेक दिवस आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष पंधरा दिवसांपूर्वी गोव्यात येऊन गेले होते. त्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दामू नाईक व इतर काही आमदारांकडून त्यांनी राजकीय स्थितीची माहिती घेतली होती.

दिल्लीहून दोन्ही नेत्यांना आमंत्रण?

गोव्याच्यादृष्टीने दिल्लीत खूप हालचाली सुरू आहेत. स्वतः पंतप्रधानांनी गोव्याच्या मंत्रिमंडळ फेररचना विषयात लक्ष घातले आहे, अशी चर्चा राजकीय गोटात आहे. मंत्री विश्वजीत राणे यांनी दिल्लीत संतोषींशी चर्चा केली. कदाचित येत्या आठवड्यात दिल्लीहून मुख्यमंत्री सावंत व विश्वजीत राणे यांना बोलावणे जाईल. एकत्र बसून मंत्रिमंडळ फेररचनेविषयी चर्चा व निर्णय केंद्रीय नेतृत्व करण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर २०२२ मध्ये काँग्रेसमधून आठ आमदार फुटून भाजपात गेले. त्यातील आलेक्स सिक्वेरा यांनाच मंत्रिपद देण्यात आले. परंतु त्यांची कामगिरी समाधानकारक नाही. आता विधानसभा अधिवेशन संपल्याने घडामोडींना वेग आलेला आहे. याबाबत दामू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिल्ली भेटीबद्दल माहिती देण्यास नकार दिला.

 

Web Title: meeting in delhi but uproar in goa vishwajit rane meets amit shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.