साखळीचा मास्टर प्लान तयार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 13:34 IST2025-04-16T13:33:43+5:302025-04-16T13:34:07+5:30
शहरातील प्रमुख रस्ते चौपदरीकरणाला सुरुवात

साखळीचा मास्टर प्लान तयार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : साखळी नगरपालिका आणि राज्य सरकारच्यावतीने 'स्वच्छ साखळी-सुंदर साखळी' संकल्पा अंतर्गत शहराचा पूर्ण मास्टर प्लॅन तयार केलेला आहे. या मास्टर प्लॅन अंतर्गत साखळीतील रस्त्यांचे चौपदरी रुंदीकरण आणि सौंदर्गीकरण केले जाईल. त्यामुळे शहराचा आधुनिक विकास दिसून येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
साखळी शहरातील रस्ते चौ पदरी होणार असून त्या कामाचा कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री तथा स्थानिक आमदार डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी नगराध्यक्षा सिद्धी प्रभू पोरोब, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर आणि इतर नगरसेवक, अधिकारी, भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. साखळी शहर देशातील आदर्श शहर व्हावे यासाठी अनेक योजना मार्गी लागत आहेत.
आधुनिक विकास साधला जाईल
आधुनिक सुविधा, क्रीडा, कला, आरोग्य, शिक्षण या बरोबरच अनेक नवे उपक्रम सुरु आहेत. शैक्षणिक हब म्हणून नावारूपास येत आहे. आता मास्टर प्लानच्या माध्यमातून आधुनिक विकास साधला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कामे दीड वर्षात पूर्ण होतील
सुरवातीला साखळी बसस्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळच्या रस्त्याचे काम हाती घेतले जाईल. त्यानंतर आरोग्य केंद्र ते होंडा पुलापर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येईल. ही कामे पूर्ण होण्यासाठी सुमारे दीड ते दोन वर्षे लागतील, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.