मनोज परब यांचा माफीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 10:49 IST2025-12-24T10:48:46+5:302025-12-24T10:49:48+5:30
झेडपी निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षासोबत युतीची बोलणी आरजीने सुरू केली होती.

मनोज परब यांचा माफीनामा
देर आए, लेकीन दुरुस्त आए. रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे प्रमुख मनोज परब यांनी काल गोमंतकीयांना आश्चर्याचा मोठा धक्का दिला. आपण काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्याविषयी जे कठोर शब्द वापरले होते, ते मागे घेतो, असे मनोजने जाहीर केले. माणिकराव ठाकरे आता ७१ वर्षांचे आहेत. गोवा मुक्त झाला नव्हता, त्यावेळी म्हणजे १९५४ साली ठाकरे यांचा महाराष्ट्रात जन्म झाला होता. आरजीचे मनोज परब आता ४० वर्षांचे आहेत. मनोजचा जन्म १९८५ सालचा. परब जन्माला आले तेव्हा गोव्यात प्रतापसिंग राणे हे मुख्यमंत्री होते व गोव्यात काँग्रेसची सत्ता होती. त्याच काँग्रेसचे ठाकरे हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते.
झेडपी निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षासोबत युतीची बोलणी आरजीने सुरू केली होती. त्यापूर्वी काँग्रेस म्हणजे फार मोठा खलनायक आहे व त्या पक्षासोबत आमची युती होऊ शकत नाही अशी आरजीची भूमिका होती. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्या पक्षाला गोव्यात राहणाऱ्या परप्रांतीयांचीही मते पूर्णपणे हवीच असतात. त्यामुळे त्या पक्षाने कधी आरजीचे पोगो विधेयक आहे, त्या स्थितीत मान्य केले नाही किंवा अत्यंत आक्रमक अशी गोंयकारवादी भूमिकाही काँग्रेसने घेतली नाही. तरीदेखील आरजी व काँग्रेस यांच्यात झेडपीसाठी युती होणार असे चित्र निर्माण झाले होते. आरजीच्या नेत्यांना युती झालेली हवी होती ही चांगली गोष्ट. सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे ही जनभावना गोव्यात आहे आणि आरजीला आता हे मान्य झालेले आहे. आपण भाजपविरोधात स्वबळावर लढू शकणार नाही याची जाणीव आरजीच्या नेत्यांना झालीय हे कौतुकास्पद आहे.
आरजीने विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पक्षासोबतही युतीची बोलणी चालवली होती. सरदेसाई यांच्यासोबतच आरजीची प्रथम मैत्री झाली होती, पण आरजीला काँग्रेससोबतच्या युतीमधून बाहेर जावे लागले. याला अमित पाटकर व विजय सरदेसाई कारणीभूत आहेत अशी टीका त्यावेळी मनोज परब यांनी केली होती. अर्थात परब यांनी युरी आलेमाव यांच्याशी तसेच काँग्रेसच्या अन्य दोन आमदारांसोबतही चांगले नाते ठेवलेले आहे. कार्ल्स फेरेरा हे हळदोण्यातून निवडून यायला हवेत म्हणून २०२२च्या निवडणुकीवेळी आरजीने हळदोण्यात आपला उमेदवार उभा केला नव्हता. आरजीकडे गोव्यात स्वतःची अशी मते आहेत. आरजी व काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र येत असतील तर गोव्यातील काही ख्रिस्ती धर्मगुरुदेखील समाधान व्यक्त करतील. यावेळी झेडपी निवडणुकीवेळी सासष्टी तालुक्यात ख्रिस्ती बांधवांची बहुतांश मते काँग्रेसला मिळाली. आम आदमी पक्षाला ती मिळू शकली नाहीत. आरजीला थोडी मते मिळाली.
आरजीला आपले स्वतःचे बलस्थान आणि स्वतःची मर्यादा ह्या दोन्ही गोष्टी कळून आलेल्या आहेत. त्यामुळेच कदाचित मनोज परब यांनी माणिकराव ठाकरे यांची काल माफी मागितली असावी. खरे म्हणजे झेडपी निवडणुकीपूर्वीच परब यांनी स्वतःच्या विधानांविषयी फेरविचार करायला हवा होता. ठाकरे हे गोव्यात मौजमजेसाठीच येतात असा अर्थ ध्वनीत होणारे विधान परब यांनी केले होते. शब्द कठोरच वापरले होते. त्यानंतर गिरीश चोडणकर, अमरनाथ पणजीकर यांनी मनोजवर टीका केली होती; पण तरीदेखील आरजी नेत्यांनी माफीची भाषा केली नव्हती. उलट पणजीकर, गिरीश वगैरेंनाच आरजीकडून टार्गेट केले गेले होते.
परब यांनी आपण आपले शब्द मागे घेत असल्याचे काल सांगितले. युती तुटल्याने नैराश्याच्या क्षणातून भावनिक होत आपण कठोर शब्द वापरले होते, असे परब काल म्हणाले. काहीही असो, पण मनोज परब यांनी आता तरी मोठे मन दाखवले व माफी मागितली ही चांगल्या राजकारणाची नांदी आहे. ठाकरे यांच्या वयाचा व ज्येष्ठतेचा परब यांनी आता आदर केला आहे. कदाचित ठाकरेही मनोज परब यांना माफ करतील. मात्र काँग्रेस व आरजी यांच्यातील दरी कधी कमी होऊ शकेल काय हा प्रश्न शिल्लक राहतोच. परब यांना २०२७ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी थिवीत काँग्रेसची गरज भासेल आणि काँग्रेसलाही सासष्टी किंवा अन्यत्र आरजीचा मैत्रीचा हात लागेलच. अन्यथा भाजपची घोडदौड विरोधकांमधील छोटे पक्ष अगोदर गारद करून टाकील हे वेगळे सांगायला नको.