पर्रीकरांच्या योजना अजूनही स्मरणात: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 09:39 IST2025-12-16T09:38:37+5:302025-12-16T09:39:48+5:30
शिवोलीतील भाजप उमेदवारांसाठी प्रचार

पर्रीकरांच्या योजना अजूनही स्मरणात: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, हणजूण : माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी दुरदृष्टीने विचार करीत सामान्य माणसांसाठी विशेष करून राज्यातील महिलांसाठी विविध योजना राबविल्या. आजही लाडली लक्ष्मी, वयस्कर लोकांसाठी असलेला निराधार निधी, तसेच गृहआधार यांसारख्या योजनांचा लाभ घेताना स्व. पर्रीकर यांची घराघरांत आठवण काढली जात असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
शिवोली विधानसभा मतदारसंघातील हणजुण, तसेच शिवोली या जिल्हा पंचायतीच्या दोन्ही जागांसाठी रविवारी मुख्यमंत्र्यांनी प्रचार केला. मुख्यमंत्र्यांनी दांडा-शिवोली येथील श्री देव जागरेश्वराच्या सभागृहात सभा घेतली. यावेळी व्यासपीठावर स्थानिक आमदार डिलायला लोबो, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, सरपंच अमित मोरजकर, जागरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष देवदत्त शिरोडकर, शिवोलीचे उमेदवार महेश्वर गोवेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य सनिशा तोरस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार लोबो, मांद्रेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
शिवोली विधानसभा मतदारसंघातील हणजुण, तसेच शिवोली या जिल्हा पंचायतीच्या दोन्ही जागांसाठी रविवारी मुख्यमंत्री सावंत यांनी प्रचार सभा घेतल्या. वेर्ला-काणका पंचायत ते कामुर्ली आणि सडये पंचायत ते मार्ना शिवोली पंचायत क्षेत्रातील विविध भागात दिवसभर प्रचार करीत मुख्यमंत्र्यांनी येथील जनतेशी थेट संवाद साधला. आमदार डिलायला लोबो यांनी सांगितले की, शिवोली मतदारसंघात मागील तीन वर्षात झालेला विकास पाहता उमेदवार महेश गोवेकर, तसेच नारायण मांद्रेकर यांना चांगला फायदा होणार आहे.
'माझे घर'चा प्रत्येक कुटुंबाला होणार फायदा
माझे घर योजना ही सामान्य गोमंतकीयांचे हित नजरेसमोर ठेवून सरकारकडून सुरू करण्यात आली असून, या योजनेचा लाभ राज्यातील प्रत्येक कुटुंबाला होणार आहे. जे कोणी या योजनेला विरोध करतात, त्यांना मतदान करू नका, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.