जानेवारीतच बाजारपेठेत आंबा दाखल; हापूस १५०० रुपयांवर, कैऱ्या १०० रुपयांना सहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 09:02 IST2026-01-31T09:02:22+5:302026-01-31T09:02:22+5:30

हापूस आंबे १,५०० रुपये डझन दराने विक्रीस ठेवण्यात आले आहेत.

mangoes enters the margao goa market in january itself hapus at 1500 and mankurad at 600 rupees | जानेवारीतच बाजारपेठेत आंबा दाखल; हापूस १५०० रुपयांवर, कैऱ्या १०० रुपयांना सहा

जानेवारीतच बाजारपेठेत आंबा दाखल; हापूस १५०० रुपयांवर, कैऱ्या १०० रुपयांना सहा

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला आंब्यांचा मोसम सुरू होतो आणि मार्च महिन्यात बाजारपेठेत आंबा दिसू लागतो. सध्या आंब्यांच्या झाडांना सध्या मोहर फुटत असतानाच मडगाव बाजारात मात्र गोव्याचा मानाचा आंबा म्हणून ओळखला जाणारा मानकुराद विक्रीसाठी दाखल झाला आहे. त्यामुळे यंदाच्या आंब्यांच्या हंगामाची नांदी लवकर म्हणजे फेब्रुवारी सुरू होण्याआधीच झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

गोमंत विद्या निकेतनसमोरील आबाद फारिया रस्त्यालगत दरवर्षी आंबे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याकडे हे मानकुराद आंबे उपलब्ध झाले आहेत. सध्या एका मानकुराद आंब्याची किंमत ६०० रुपये इतकी असून हापूस आंबे १,५०० रुपये डझन दराने विक्रीस ठेवण्यात आले आहेत. मडगाव बाजारपेठेत आंब्यांची आवक सुरू झाली असली, तरी ती अद्याप मर्यादित आहे. मोठ्या प्रमाणावर फळांची आवक झालेली नसल्यामुळे आंब्यांचे दर गगनाला भिडले आहेत. बाजारात मानकुराद आंब्याची डझनामागे सुमारे ७ हजार २०० रुपये दराने विक्री करण्यात येत आहे.

यंदा हिवाळ्यातील थंडीचा कडाका चांगला असल्यामुळे आंब्याच्या झाडांना मोहर मोठ्या प्रमाणात आला. मात्र गेल्या काही दिवसांत दव पडण्याचे प्रमाण वाढल्याने त्याचा फळांच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरीही एकूण परिस्थिती पाहता यावर्षी आंब्याचे उत्पादन समाधानकारक राहील, अशी आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सध्या मडगाव बाजारात दाखल झालेल्या आंब्यांची संख्या अल्प आहे. उत्पादनाचा मुख्य हंगाम सुरू होण्यासाठी अजून किमान १५ ते २० दिवसांचा कालावधी असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात काढण्यात आलेली फळे पिकलेली असली, तरी त्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे दर वाढलेले दिसून येत आहेत.

मडगावातील आंबा व्यापारी नरेंद्र नाईक यांनी सांगितले की, सध्या बाजारपेठेत हापूस तसेच गोव्याचा मानकुराद आंबा उपलब्ध आहे. याशिवाय आंब्यांच्या कैऱ्यांनाही चांगली मागणी आहे. आगामी १५ ते २० दिवसांत फळांची आवक वाढल्यास आंब्यांचे दर कमी होतील आणि ग्राहकांना तुलनेने स्वस्त दरात आंबे खरेदी करता येतील.

कैऱ्या १०० रुपयांना सहा

मानकुराद आंब्याबरोबर मडगाव येथील बाजारात हापूस आंबाही दाखल झाला आहे. सध्या या आंब्यांचा दर १,५०० रुपये डझन आहे. मानकुरादनंतर गोमंतकीय हापूस आंब्याची खरेदी करताना दिसतात. सध्या दोन्ही आंब्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने मोजकेच ग्राहक या आंब्यांची खरेदी करताना दिसतात. मडगाव बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात कैऱ्याही दाखल झाल्या आहेत. आकारानुसार या कैऱ्यांचे दर आहेत. सध्या सहा कैऱ्यांना १०० रुपये या दराने विकल्या जात आहेत.
 

Web Title : बाज़ार में आमों की जल्दी दस्तक; अल्फांसो ₹1500, कच्चा ₹100 में छह

Web Summary : मडगाँव बाज़ार में मानकुराद और अल्फांसो किस्मों के साथ आम का मौसम जल्दी आ गया है। सीमित आपूर्ति के कारण कीमतें अधिक हैं; मानकुराद ₹7200/दर्जन, अल्फांसो ₹1500/दर्जन। कच्चे आम छह के लिए ₹100 में बिक रहे हैं। आपूर्ति बढ़ने पर कीमतों में गिरावट की उम्मीद है।

Web Title : Mangoes Arrive Early in Market; Alphonso ₹1500, Raw ₹100 for Six

Web Summary : Mango season arrives early in Madgaon market with Mankurad and Alphonso varieties. Prices are high due to limited supply; Mankurad at ₹7200/dozen, Alphonso at ₹1500/dozen. Raw mangoes are selling at ₹100 for six. Prices are expected to drop as supply increases.