'माझे घर' योजना भाजपला आली कामी; विश्वजीत व दिव्या राणे यांचा प्रभाव वाढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 09:26 IST2025-12-23T09:25:29+5:302025-12-23T09:26:36+5:30
चिंबल, रामनगर-बेती, सुकूर, झुवारीनगर आदी झोपडपट्टी भागातील उमेदवारांना लाभ; केरी, होंडा, नगरगावची लीड सर्वांत जास्त

'माझे घर' योजना भाजपला आली कामी; विश्वजीत व दिव्या राणे यांचा प्रभाव वाढला
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सत्तरी तालुक्यातील तिन्ही झेडपी मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारांना प्रत्येकी दहा हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी मिळाली. शिवाय, उसगावची जागादेखील भाजपने मोठ्या मताधिक्याने जिंकली. मंत्री विश्वजीत राणे व पर्येच्या आमदार दिव्या राणे यांचा प्रभाव कायम असल्याचे व उलट हा प्रभाव वाढल्याचे झेडपी निवडणूक निकालाने दाखवून दिले, अशी चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पसरली आहे.
होंडा, नगरगाव, केरी व उसगाव अशा चारही ठिकाणी यावेळी मंत्री विश्वजीत राणे यांनी भाजपतर्फे नवे उमेदवार दिले होते. लोकांना जास्त परिचित नसलेले चेहरे विश्वजीत राणे व दिव्या राणे यांनी पुढे आणले. रोज या चारही उमेदवारांचा त्यांनी प्रचार केला.
केरी मतदारसंघातून सर्वाधिक म्हणजे बारा हजारांपेक्षा जास्त मतांची लीड घेऊन भाजपने विजय प्राप्त केला. नगरगाव व होंड्यातही प्रत्येकी दहा हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी भाजपने घेतली. उसगावमध्ये समीक्षा नाईक यांनी काँग्रेसच्या उमेदवार मनीषा उसगावकर यांना टक्कर दिली. उसगावमध्ये विश्वजीत राणे यांनी सर्वाधिक कोपरा बैठका व सभा घेतल्या होत्या. तिथे तीन हजारांहून जास्त मतांची आघाडी घेत समीक्षा जिंकल्या.
सत्तरी तालुक्यात विश्वजीत राणे हे पूर्वीसारख्या जास्त सरकारी नोकऱ्या अलीकडे देऊ शकले नाहीत. दिव्या राणे यांनादेखील पर्ये मतदारसंघात जास्त नोकऱ्या देणे अडचणीचे झाले. मात्र, युवा-युवतींनी यावेळच्या झेडपी निवडणुकीत राणे यांना व पर्यायाने भाजपला पाठिंबा दिला. सत्तरी तालुक्यात काँग्रेसचा सफाया झाला. आरजीचाही सफाया झाला. आपचाही प्रभाव पडला नाही. फक्त उसगावमध्ये काँग्रेसने प्रभावी लढत दिली.
जि. पं. निवडणुकीत सरकारची 'माझे घर' योजना कामी आल्याचे दिसून आले आहे. चिंबल, रामनगर - बेती, सुकूर, झुवारीनगर भागातील झोपडपट्टीतून भाजप उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे स्पष्ट झाले. चिंबल मतदारसंघात येणाऱ्या इंदिरानगर झोपडपट्टीत सुमारे ४,५०० मते असून, घरे नियमित करण्याच्या सरकारच्या योजनेमुळे भाजप उमेदवार गौरी कामत यांच्या पारड्यात ही मते पडली व विजयी होण्यास त्यांना सोपे गेले.
रामनगर, बेती येथेही झोपडपट्टीतील मते मोठ्या प्रमाणात भाजप उमेदवाराला मिळाली. यामुळे रेईश मागुशमध्ये रेश्मा बांदोडकर विजयी ठरल्या. सुकूर मतदारसंघात २० कलमी कार्यक्रमांतर्गत सरकारी जमिनींमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होती. 'माझे घर'मुळे दिलासा मिळाल्याने येथेही भाजप उमेदवार अमित अस्नोडकर यांना मोठ्या प्रमाणात मते मिळाली.
सांकवाळमध्ये भाजप उमेदवार सुनील गावस यांच्या विजयाचे श्रेय या भागातील झोपडपट्टीवासीयांनी दिलेल्या मतांमुळेच असल्याचे मानले जाते. इतर मतदारसंघांमध्येही भाजपला 'माझे घर' मुळे चांगली मते मिळाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ४ ऑक्टोबर रोजी योजनेचा शुभारंभ केला. नंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी निवडणूक प्रचारात या योजनेला प्रमुख मुद्दा बनवला होता.
१२,१२८चे मताधिक्य
दरम्यान, सत्तरी तालुक्यातील केरी झेडपी मतदारसंघात भाजपला जेवढी लिड मिळाली तेवढी लिड पूर्ण गोव्यात कुठेच मिळू शकली नाही. केरी येथे १२ हजार १२८ मतांची आघाडी घेऊन भाजपचा उमेदवार जिंकला. हा झेडपी मतदारसंघ आमदार दिव्या राणे यांच्या पर्ये विधानसभा मतदारसंघात येतो. होंडा येथेही दहा हजारांपेक्षा जास्त व नगरगावमध्येही दहा हजारांहून जास्त मतांची आघाडी भाजपच्या उमेदवारांना मिळाली. सत्तरी तालुक्यात भाजपने असा विक्रम केला. डिचोली तालुक्यातील पाळी मतदारसंघात भाजपला सुमारे ९,२०० मतांची आघाडी प्राप्त झाली.