महाकुंभ: दुसरी रेल्वे आज; आतापर्यंत तब्बल तीन हजार गोमंतकीयांनी केली नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2025 12:28 IST2025-02-13T12:27:25+5:302025-02-13T12:28:00+5:30
१,३०० भाविक या रेल्वेने जातील, अशी माहिती समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

महाकुंभ: दुसरी रेल्वे आज; आतापर्यंत तब्बल तीन हजार गोमंतकीयांनी केली नोंदणी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : प्रयागराजला जाण्यासाठी ३ हजाराहून अधिक भाविकांनी नोंदणी केलेली आहे. मडगावहून दुसरी रेल्वे उद्या, गुरुवारी दुपारी ४:४० वाजता निघणार आहे. १,३०० भाविक या रेल्वेने जातील, अशी माहिती समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना फळदेसाई म्हणाले की, मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा योजनेखाली महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना गोवा सरकारने मोफत रेल्वेची व्यवस्था केली असून या उपक्रमातील ही दुसरी रेल्वे आहे. ६ फेब्रुवारी रोजी गेलेल्या रेल्वेतून १,१९१ यात्रेकरूंनी प्रवास केला. आता दुसरी रेल्वे उद्या दुपारी निघणार असून १८ रोजी सकाळी ११:३० वाजता मडगावला परतेल. प्रयागराजला पोहोचल्यानंतर भाविकांना साधारणपणे ३० किलोमीटर चालावे लागते. त्यामुळे सुदृढ व्यक्तींनीच या योजनेचा लाभ घ्यावा. अठरा वर्षांखालील तसेच साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या भाविकांनी जाऊ नये, असे आवाहन फळदेसाई यांनी केले.
रोज दीड ते दोन कोटी भाविक प्रयागराजमध्ये असतात. त्यामुळे तिथे उतरल्यानंतर यात्रेकरूंची जबाबदारी सरकार घेणार नाही. २४ तास रेल्वे थांबणार आहे. या काळात पवित्र स्नान करता येईल. प्रयागराजला थंडी असल्याने थंडीचे कपडे सोबत घ्यावेत. परंतु जास्त सामान घेऊ नये. त्यामुळे अडचणी उद्भवू शकतात. समाजकल्याण खात्याने दिलेले ओळखपत्र सोबत असणे अनिवार्य आहे. तिकीट कन्फर्म झालेली आहे व मेसेज पाठवलेला आहे, त्यांनीच रेल्वे स्थानकावर यावे. प्रयागराजला जातेवेळी जेवणाची योग्य व्यवस्था होईल.
२१ रोजी आणखी रेल्वे निघणार आहे. तत्पूर्वी मधल्या काळात व्यवस्था झाल्यास अजून एक रेल्वे आम्ही पाठवू, तसेच जाणाऱ्या रेल्वेसाठी अधिकाधिक डबे जोडले जातील, हे पाहू, असेही फळदेसाई म्हणाले.
समाजकल्याण खाते पर्वरीत स्थलांतरित होणार
समाजकल्याण खात्यासाठी पर्वरी येथे बांधलेल्या गृहनिर्माण मंडळाच्या नव्या मार्केट संकुलात जागा घेतली असून पुढील तीन-चार महिन्यांत तिथे स्थलांतर केली जाईल, असे मंत्री फळदेसाई यांनी स्पष्ट केले. पणजीतील जुन्या इमारतीचे संवर्धन केले जाईल,' असे ते म्हणाले.