मुख्यमंत्र्याच्या दावेदारीसाठीच फालेरोंची दिग्विजय सिंगावर तोफ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 17:18 IST2019-02-21T17:17:34+5:302019-02-21T17:18:10+5:30
कुठलाही अंतस्थ हेतू नसताना राजकीय भाष्य करत नसलेले नावेलीचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री लुईजीन फालेरो यांनी गोव्यात सध्या काहीशी राजकीय अस्थिरता निर्माण झालेली असताना काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांच्यावर तोफ डागण्यामागे वेगवेगळे तर्क राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जातात.

मुख्यमंत्र्याच्या दावेदारीसाठीच फालेरोंची दिग्विजय सिंगावर तोफ?
मडगाव - कुठलाही अंतस्थ हेतू नसताना राजकीय भाष्य करत नसलेले नावेलीचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री लुईजीन फालेरो यांनी गोव्यात सध्या काहीशी राजकीय अस्थिरता निर्माण झालेली असताना काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांच्यावर तोफ डागण्यामागे वेगवेगळे तर्क राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जातात. यदाकदाचित सध्याच्या राजकीय अस्थिरतेमुळे भाजप सरकार कोसळले आणि काँग्रेसने सत्ता स्थापन केली तर मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत आपण मागे राहू नये यासाठीच फालेरो हे पुन्हा गोव्यातील राजकारणाच्या सेंटर स्टेजवर येऊ पहातात असे वाटते.
सोमवारी नावेली येथील एका रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करताना फालेरो यांनी ही तोफ डागली होती. दोन वर्षापूर्वी काँग्रेसकडे पुरेशे संख्याबळ असतानाही केवळ दिग्वीजय सिंग यांच्यामुळेच सरकार स्थापनेचे पत्र आपण राज्यपालांना देऊ शकलो नव्हतो असे फालेरो म्हणाले होते. हे सांगतानाच लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आपण इच्छुक नसल्याचेही त्यांनी म्हटले होते.
वास्तविक दक्षिण गोव्यातून आपल्याला लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी फालेरो यांनी दिल्लीत लॉबिंग सुरु केले होते. त्यांचे जवळचे सहकारीच खासगीत ही गोष्ट मान्य करत होते. केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास आपल्याला केंद्रीय मंत्रीपद मिळू शकते हा त्यामागचा त्यांचा उद्देश असल्याचे सांगितले जात होते. येथे गोव्यातही फालेरो यांना काँग्रेसच्या कामकाजापासून दोन हात दूरच ठेवण्यात आले होते. गोव्यातील त्यांची सर्व जबाबदारी काढून घेऊन त्यांच्याकडे ईशान्येतील सात राज्यांचा कारभार सोपविला होता. शक्य असल्यास त्यांना खासदार म्हणून दिल्लीत पाठविण्यासाठीही हालचाली सुरु झाल्या होत्या.
मात्र भाजपाचे म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोजा यांच्या निधनानंतर गोव्यात भाजपा पुन्हा एकदा अल्पमतात आल्यानंतर काँग्रेसने इतर पक्षांकडे हातमिळवणी करण्याचे संकेत देत शक्य असल्यास सरकार पाडण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्यामध्ये पुढाकार घेतला होता. गोव्यातील राजकीय अस्थिर परिस्थितीत जर सत्ता बदल झाला तर दोन वर्षापूर्वी आपल्यावर अन्याय केला म्हणून आता आपल्याला संधी देण्यात यावी, अशी मागणी पुढे करता यावी यासाठी फालेरो यांनी हा आरोप केल्याचे काँग्रेस सूत्रांकडूनच सांगितले जाते.
असे जरी असले तरी फालेरो यांनी अवेळी केलेल्या या राजकीय गौप्यस्फोटामुळे सध्या फालेरो यांनाच टीकेचे धनी व्हावे लागले आहे. त्यांचेच काँग्रेस पक्षातील सहकारी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी फालेरो यांचे नाव न घेता लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना काँग्रेसमधील ज्येष्ठ सहका:यांना लोकांना गोंधळात टाकणारी विधाने करु नयेत असे म्हटले आहे तर विरोधी पक्ष नेते चंद्रकांत कवळेकर यांनी, सत्ता न स्थापन करण्यामागे दिग्विजय सिंग यांचा दोष नाही. पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा नेता ठरत नव्हता त्यामुळे दिग्वीजय सिंग सर्वाची मते जाणून घेत होते. या प्रक्रियेत थोडा उशिर झाला. दरम्यानच्या काळात भाजपाने इतर पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापनेचा दावा केला आणि राज्यपालांनीही सर्व राजकीय संकेत धुडकावून अल्पमतातील भाजपाला सत्ता स्थापन करण्याची अनुमती दिली, असे ते म्हणाले.
भाजपाला बाजूला सारून निधर्मी काँग्रेस गोव्यात सत्तेवर यावी यासाठी प्रयत्न करणारे आणि काँग्रेसची निर्णयप्रक्रिया ज्या ठिकाणी चालू होती त्यावेळी तेथे उपस्थित असलेले मडगावातील नामांकित डॉक्टर फ्रान्सिस कुलासो यांनी फालेरो यांची या वक्तव्याबद्दल जाहीर निर्भत्सना करताना ज्यावेळी आम्ही भाजप सत्तेवर येऊ नये यासाठी प्रयत्न करत होतो त्यावेळी काँग्रेसचा नेता ठरत नव्हता. काँग्रेसचा सर्वमान्य नेता पुढे आणण्याच्या ऐवजी त्यावेळी फालेरो केवळ आपलीच टिमकी वाजवित होते असे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर म्हटले आहे. याच घडामोडीचा आणखी एक साक्षीदार असलेल्या एका व्यक्तीने या सा:या घटनाक्रमांवर टिप्पणी करताना, काँग्रेसचा नेताच कोण तो ठरला नव्हता.
त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी पत्र देण्याची परवानगी दिग्वीजय सिंग यांना देताच आली नाही. पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करु शकत नाही. हा दावा नेतेपदी नियुक्त झालेला आमदारच करू शकतो याची जाणीव फालेरो यांना नाही का? असे विचारत रस्ता उद्घाटनाच्यावेळी फालेरो यांना हे वक्तव्य करण्याची बुद्धी का झाली तेच कळत नाही असे ते म्हणाले.