'गोवन ऑफ द इयर'चा दिमाखदार सोहळा उद्या पणजीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 08:05 IST2025-03-11T08:04:16+5:302025-03-11T08:05:51+5:30

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव

lokmat goan of the year 2025 ceremony to be held in panaji tomorrow | 'गोवन ऑफ द इयर'चा दिमाखदार सोहळा उद्या पणजीत

'गोवन ऑफ द इयर'चा दिमाखदार सोहळा उद्या पणजीत

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लोकमत मीडियातर्फे आयोजित बहुप्रतीक्षित 'गोवन ऑफ द इयर अवॉर्ड २०२५' उद्या, बुधवारी सायंकाळी ५ वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. पणजी येथील हॉटेल गोवा मॅरियटमध्ये हा सोहळा पार पडेल.

सोहळ्यात क्रीडा, आरोग्य, पर्यटन, शिक्षण, पर्यावरण, कला व संस्कृती, पोलिस अधिकारी, रेस्टॉरंट, प्रशासकीय अधिकारी या विभागात प्रत्येकी चार जणांना नामांकन देण्यात आले असून ऑनलाईन मतांद्वारे विजेता जाहीर होणार आहे.

लोकमतने या पुरस्कारांसाठी एक स्वतंत्र ज्युरी मंडळ नामवंत उद्योगपती अनील खंवटे यांच्या नेतृत्वाखाली नेमले होते. त्यात दौलतराव हवालदार, ब्रह्मानंद शंखवाळकर, डॉ. पांडुरंग फळदेसाई, प्रवीण सबनीस, प्रा. गोविंद पर्वतकर, डॉ. शकुंतला भरणे या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता. या सोहळ्यात जीवन गौरव पुरस्कार, दशकातील सर्वात यशस्वी नेता, वरिष्ठ आयएएस अधिकारी, सक्षम विधिमंडळपटू, पायाभूत सुविधांसाठी अतुलनीय योगदान, पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदान हे पुरस्कारही देण्यात येतील.

या पुरस्कारांची प्रक्रिया अत्यंत पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यात आली. लोकमतमध्ये प्रत्येक विभागातून नामांकने जाहीर करून लोकांकडून मते मागवण्यात आली. कोड स्कॅन करून मत देण्याची मुभा होती. वैयक्तिकरीत्या नामांकने मिळालेल्या सर्व जणांना, तसेच सोशल मीडियावरील विविध ग्रुप्सवर गुगल फॉर्मची लिंक पाठवून मते मागविण्यात आली होती. मतदानाला उदंड प्रतिसाद मिळाला. अत्यंत चुरशीचा सामना झाला. नामांकन मिळालेल्या विभागातील पुरस्कारांची घोषणा कार्यक्रमस्थळी होईल. या कार्यक्रमासाठी प्राईम मीडिया टीव्ही पार्टनर, डीएनए गोवा ऑनलाईन पार्टनर तर सारा डिजिटल पार्टनर आहेत.

१२ महिलांचा वुमन अचिव्हर्स अवॉर्डने सन्मान

लोकमत सखी मंच आपला रौप्य महोत्सव साजरा करत असल्याने गोवन ऑफ द इयर या कार्यक्रमातच बारा तालुक्यांतून १२ महिलांना वुमन अचिव्हर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे. महिलांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचं क्षितीज आज विस्तारलेलं आहे. गृहिणी असो किंवा करिअर करणारी महिला आपापल्या ठिकाणी राहून समाजाला काही तरी चांगलं देण्याचा, एक सकारात्मक बदल घडवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. प्रत्येक तालुक्यातून अशा एका सौदामिनीचा सन्मान या निमित्ताने करण्यात येणार आहे. हे पुरस्कार मुख्य पाहुणे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहेत.

या मान्यवरांचा गौरव

जीवन गौरव पुरस्कार : प्रतापसिंग राणे
दशकातील सर्वात यशस्वी नेता : डॉ. प्रमोद सावंत
वरिष्ठ आयएएस अधिकारी: डॉ. व्ही. कांदावेलू
सक्षम विधिमंडळपटूः नीलेश काब्राल
पायाभूत सुविधांसाठी अतुलनीय योगदान : अतुल भोबे
पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदान : किरण ठाकुर

 

Web Title: lokmat goan of the year 2025 ceremony to be held in panaji tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.