सत्तेचा माज उतरवूया; आमदार गोविंद गावडे समर्थकांचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 14:06 IST2025-09-29T14:05:53+5:302025-09-29T14:06:36+5:30
'उटा - गाकुवे'चा फर्मागुडीत मेळावा

सत्तेचा माज उतरवूया; आमदार गोविंद गावडे समर्थकांचा निर्धार
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : आदिवासी बांधवावर व आदिवासी बांधवांच्या 'उटा' संघटनेवर ज्या प्रमाणात अन्याय व मुस्कटदाबी होत आहे, ते पाहता वेगळा विचार करण्याची वेळ आलेली आहे. ज्या लोकांना सत्तेची मस्ती चढलेली आहे, ज्यांना सत्तेच्या मर्यादा माहीत नाहीत, त्या लोकांची मस्ती जिरवण्याची वेळ आली आहे. आणि ती ताकद 'उटा बांधवां'मध्ये नक्कीच आहे, असा इशारा आमदार तथा उटा-गाकूवे संघटनेचे समन्वयक गोविंद गावडे यांनी दिला.
फर्मागुडी येथील गोपाळ गणपती मंदिराच्या सभागृहात रविवारी उटा कार्यकर्त्यांची सभा झाली. या सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी संघटनेचे मार्गदर्शक प्रकाश वेळीप, अध्यक्ष विश्वास गावडे, दुर्गादास गावडे, मोलू वेळीप, दया गावकर, उदय गावकर, रोमाल्ड गोन्साल्वीस आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
'२४ तासांत गोवा बंद करण्याची ताकद आमच्यात निश्चितच आहे' असे आव्हान विरोधकांना देताना आमदार गावडे म्हणाले की, 'डॉ. काशिनाथ जल्मी नेहमी म्हणायचे, राजकारण व समाजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांचे स्वप्न सत्यात उतरवण्याची वेळ आलेली आहे. जोपर्यंत आमची राजकीय ताकद वाढणार नाही तोपर्यंत आम्ही आमचे वेगळे अस्तित्व सिद्ध करू शकणार नाही. त्याकरताच स्वतःची राजकीय ओळख निर्माण करूया.' आमदार गावडे म्हणाले की, 'काणकोण येथील आमच्या पहिल्या सभेनेच काही लोकांच्या काळजात धडकी भरली आहे. त्यामुळेच उटा बांधवांमध्ये स्फुरण चढले आहे. सोसण्याची वेळ आता संपलेली आहे. आता कृती करण्याची वेळ आली आहे.'
विश्वास गावडे म्हणाले, 'आजपर्यंत आम्ही गोमंतकीयांच्या हिताचेच काम केले आहे. ज्यावेळेस समाजाला गरज असते, त्यावेळी तिथे उटाने आवाज काढला तर तिथे विजय निश्चित असतो हे कोडार आयआयटी आंदोलनाने दाखवून दिले आहे. यापुढे आम्ही वाड्या-वाड्यावर उटा कार्यकर्त्याची सभा घेऊया. चाळीसही मतदारसंघात आमची ताकद वाढवत राहूया.'
डॉ. उदय गावकर म्हणाले, 'आम्ही संघर्ष करून योजना पदरात पाडून घेतल्या. परंतु योजनांचे लाभ मिळवताना आमच्यासमोर असंख्य आव्हाने निर्माण केली जातात. आमच्या चळवळीचा संदर्भघेऊन दिशाभूल करण्याचे जे षड्यंत्र रचले जात आहे, त्यांना त्यांची जागा दाखवूया. गोविंद गावडे हा आज आमचा बुलंद आवाज बनलेला आहे. त्याच्यामागे खंबीरपणे उभे राहूया.' कार्यक्रमाच्या सुरुवातीला दुर्गादास गावडे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. सतीश वेळीप यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
... तर त्यांना खाली पाडून आम्ही पुढे जाऊ
विरोधकांना आव्हान देताना आमदार गोविंद गावडे म्हणाले, 'आमच्या चळवळीला खो घालण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही तुमच्या वाटेला जाणार नाही, तुम्ही आमच्या वाटेत येऊ नका. मात्र, आता आमच्या वाटेत जो कोणी येईल, त्याला खाली पाडूनच आम्ही पुढे जाणार आहोत.'
कोणत्याही पक्षाचे होण्यापेक्षा उटाचे कार्यकर्ते व्हा
आमदार गावडे म्हणाले की, 'आमच्या उटाचे कार्यकर्ते कदाचित कोणत्यातरी एका पक्षाकडे संलग्न असतील. परंतु आता वेगळा विचार करण्याची वेळ आली आहे. कोणत्या तरी पक्षाचे कार्यकर्ते होण्यापेक्षा आता तुमच्या स्वतःच्या उटाचे कार्यकर्ते बना. समाज बांधवांपैकी जे कोणी समाजात फूट घालण्याचे प्रयत्न करत आहेत, त्यांचीसुद्धा गय केली जाणार नाही. आता आम्ही फक्त जुजबी सूचना करत आहोत. तुमच्यात सुधारणा नाही झाल्यास आमचे उग्ररूप तुम्हाला नक्की दाखवू.'
२७ जागा निवडून आणूः प्रकाश वेळीप
संघटनेचे मार्गदर्शक माजी मंत्री प्रकाश वेळीप म्हणाले, 'ज्या-ज्या वेळी समाजबांधवांवर अन्याय होतो, त्या-त्यावेळी आम्ही सर्वप्रथम तिकडे पोहोचतो, हे अनेक घटनांमधून सिद्ध झाले आहे. आमची ताकद वाढविण्याची वेळ आली आहे. आम्ही २०२७ मध्ये २७जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूया. सगळ्यांनीच संघटनेचे धास्ती घेतली पाहिजे, असे वातावरण निर्माण करूया. त्यासाठी मतभेद बाजूला ठेवून काम करूया.'