राज्यात ट्रिपल इंजिन सरकार स्थापन करूया: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 12:45 IST2025-12-12T12:45:32+5:302025-12-12T12:45:52+5:30
हरमल जिल्हा पंचायत मतदारसंघात भाजप-मगो युतीचा प्रचार

राज्यात ट्रिपल इंजिन सरकार स्थापन करूया: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, हरमल : राज्यात 'माझे घर' योजनेला काँग्रेस, गोवा फॉरवर्ड व अन्य पक्षांनी थेट विरोध केला होता. ती मंडळी जिल्हा पंचायत निवडणुकीत मते मागण्यासाठी येतील, त्यांना जाब विचारा. भाजप सरकारच्या कार्याची पोचपावती म्हणून उत्तर व दक्षिण जिल्हा पंचायत भाजप-मगो युतीला सत्ता देऊन राज्यात ट्रिपल इंजिन सरकार स्थापित करूया, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हरमल येथे केले.
हरमल जिल्हा पंचायत मतदारसंघाच्या भाजप मगो युतीच्या उमेदवार मनिषा कोरकणकर यांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, माजी आमदार दयानंद सोपटे, निरीक्षक गोविंद पर्वतकर, सरपंच धरती नागोजी, स्नेहा गवंडी, गृहनिर्माण महामंडळाचे संचालक तथा माजी पंच प्रवीण वायंगणकर, सागर तिळवे, भाजप मंडळ अध्यक्ष उत्तम पोखरे, सचिन परब, पंच रजनी इब्रामपुरकर, शिवा तिळवे, पंढरीनाथ आरोलकर आदींची भाषणे झाली.
जिल्हा पंचायत सदस्य निवडून दिल्यास राज्यात खऱ्या अर्थाने ट्रिपल इंजिन सरकार होईल. प्रत्येक पंचायत क्षेत्रातील लहान पायवाटा, मंदिरे आर्दीची कामे होतील. 'सबका साथ सबका विकास' हा भाजप सरकारचा उद्देश असून जात, पात व धर्माच्या पलीकडे २४ तास व ३६५ दिवस जनतेचे कार्य करीत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
महादेव गावडे यांनी अन्य मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रनिवेदन दिपा तळकर तर माजी अध्यक्ष मधु परब यांनी आभार मानले. सभेस केरी, पालये, हरमल व कोरगाव पंचायत क्षेत्रातील कार्यकर्ते मतदार बहुसंख्येने उपस्थित होते.