'बाकीबाब'च्या स्मारकास मिळाली जागा, हवाय निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 12:58 IST2025-07-08T12:57:33+5:302025-07-08T12:58:24+5:30

या स्वप्नपूर्तीसाठी सरकारच्या आर्थिक पाठबळासह पुढाकाराची आवश्यकता आहे.

land for borkar memorial found but funds needed | 'बाकीबाब'च्या स्मारकास मिळाली जागा, हवाय निधी

'बाकीबाब'च्या स्मारकास मिळाली जागा, हवाय निधी

यामिनी मडकईकर, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : 'माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्याकपारी मधोनी घट फुटती दुधाचे' तसेच 'त्या दिसा वडा कडेन गडद तिनसना, मंद मंद वाजत आयली तुजी गो पांयजणा' अशा अजरामर कविता लिहून मराठी व कोकणी भाषेला समृद्ध करणारे कविवर्य बा. भ. बोरकर ऊर्फ बाकीबाब बोरकर यांचे स्मारक गोव्यामध्ये, विशेषतः बोरकरांच्या जन्मभूमीत उभे राहावे असे स्वप्न गोव्याबरोबरच महाराष्ट्रातील शेकडो साहित्यिकांचे आहे. हे स्वप्न साकारण्यासाठी मागील काही वर्षांपासून बोरकरांचे कुटुंबीय धडपडत आहे. मात्र या स्वप्नपूर्तीसाठी सरकारच्या आर्थिक पाठबळासह पुढाकाराची आवश्यकता आहे.

बोरकरांचे बालपण बोरी येथील 'शांतिनिकेतन' या घरामध्ये गेले. त्या घरातच त्यांनी शेकडो प्रसिद्ध कविता लिहिल्या. काव्यरसिकांच्या मनावर राज्य केले. अशा थोर कवीचे त्यांच्या जुन्या घरामध्ये स्मारक व्हावे अशी इच्छा त्यांच्या मुलींबरोबरच हजारो साहित्यप्रेमींची आहे. बोरकरांचे हे घर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे, चुलते यांचे संयुक्त आहे. त्यामुळे बोरकरांच्या कन्या मुक्ता आगशीकर यांनी त्यासाठी जागा मिळवली आहे.

आगशीकर यांनी सांगितले की, मी गेल्या चार वर्षापासून जागा मिळवण्यासाठी खटपट करत आहे. मोठ्या खटपटीनंतर बोरी येथील सूर्यनारायण देवस्थानजवळ 'कोमिनिदाद' कडून जागा घेतली आहे. सध्या जमिनीचा ताबा मिळाला आहे. बोरकर यांच्या कवितांनी केवळ गोव्यातच नव्हे तर महाराष्ट्रातही छाप उमटवली. त्यांचे स्मारक गोव्यामध्ये चांगले व सुंदर व्हावे अशी इच्छा आहे. सध्या याचा आराखडा तयार असून केवल पैशांची आवश्यकता आहे. याविषयी मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन स्मारक लवकर उभारावे, अशी मागणी केली आहे. त्यांनीही हे काम लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर यांनीही आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे. या कामासाठी सरकारकडे पाच कोटी रुपयांची मागणी केली आहे. साहित्यिक तसेच दानशूर लोकांकडे आर्थिक मदत मागण्यापूर्वी सरकारने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारही यासाठी नक्कीच हातभार लावेल याचा विश्वास आहे.'

पायऱ्यांना जोडले जातात हात

माझ्या बाबांचे बालपण ज्या घरात गेले, ते घर १०० वर्षाहून अधिक जुने आहे. ते मातीचे असल्यामुळे पावसाळ्यात कधीही कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली होती म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन निधी उभारून त्याचे नूतनीकरण केले आहे. सध्या चुलतभाऊ ते काम पाहत आहे असे मुक्ता आगशीकर यांनी सांगितले. बोरकर हे केवळ गोमंतकीय कवी नसून महाराष्ट्रात त्यांनी अनेक रसिकांच्या, साहित्यिकांच्या काळजात जागा मिळवली. अशा जगप्रसिद्ध कवीचे घर पाहण्यासाठी अनेक लोक येतात. बोरकरांचे घर म्हणून या घराच्या पायऱ्यांवर नतमस्तक होतात.

हे आपले भाग्य आहे : विठ्ठल गावस

बा. भ. बोरकर हे गोव्यातील मोठे, प्रसिद्ध कवी. ज्याप्रमाणे बंगालमध्ये रवींद्रनाथ टागोर यांचे स्मरण केले जाते, महाराष्ट्रात साहित्यिक कुसुमाग्रजांचे स्मरण करण्यासाठी स्मारक उभारले आहे, तशाच प्रकारे बा. भ. बोरकरांचे नाव कायम राहावे यासाठी गोव्यात स्मारक व्हायला हवे. त्यांच्यासारखा कवी गोव्यामध्ये जन्माला येणे हे गोमंतकीयांचे मोठे भाग्य आहे. त्यांचे अद्याप स्मारक उभारले नाही, ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. स्मारक उभारणे ही खरे तर गोवा सरकारची जबाबदारी आहे. तरच आपण भावी पिढीला बोरकरांविषयी सांगू शकू, असे मत ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल गावस यांनी व्यक्त केले.

माझ्या हयातीत व्हावे स्मारक

सध्या मी ७५ वर्षांची आहे. गेली चार वर्षे जागेसाठी धडपड केली. मी जिवंत असताना बाबांचे स्मारक उभारले जावे अशी इच्छा आहे. हे काम पुढे नेण्यास माझ्यामध्ये बळ आहे, तोपर्यंत ते पुढे जाईल. त्यासाठी राज्य सरकार तसेच साहित्यिक व गोमंतकीयांनी बा. भ. बोरकर स्मारक प्रतिष्ठानला मदत करावी, असे आवाहन आगशीकर यांनी केले.

माझ्या वडिलांनी गोव्याच्या भूमीसाठी खूप काही केले. आपली नोकरी सोडून स्वातंत्र्यसैनिक म्हणून स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. यासाठी त्यांना खूप त्रासही सहन करावा लागला होता. मराठीबरोबरच कोंकणीमध्येही त्यांचे काम खूप मोठे आहे. अशा प्रसिद्ध कवीविषयी गोव्यातील लोकांनी त्यांची आठवण राखून ठेवण्याची गरज आहे, तरच येणाऱ्या पिढीला बोरकरांची ओळख पटेल. - मुक्ता आगशीकर, बा. भ. बोरकर यांच्या कन्या.
 

Web Title: land for borkar memorial found but funds needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा