कोंकणी भाषा प्रगत; पण समर्थ नेतृत्वाचा अभाव; प्रख्यात साहित्यिक दामोदर मावजो यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2025 13:16 IST2025-01-30T13:15:37+5:302025-01-30T13:16:16+5:30
मिरामार येथील धंपे महाविद्यालयात हे व्याख्यान झाले.

कोंकणी भाषा प्रगत; पण समर्थ नेतृत्वाचा अभाव; प्रख्यात साहित्यिक दामोदर मावजो यांचे मत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कोंकणी भाषेची प्रगती झाली असली तरी त्यामध्ये समर्थ नेतृत्वाचा अभाव असल्याचे प्रतिपादन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक दामोदर मावजो यांनी केले. गोवा विद्यापीठाच्या बा. भ. बोरकर अध्यासनातर्फे 'कोंकणी साहित्यात काल्पनिक कथेचे स्थान' या विषयावर भायोजित व्याख्यानात ते बोलत होते. मिरामार येथील धंपे महाविद्यालयात हे व्याख्यान झाले.
साहित्यिक मावजो म्हणाले की, 'कोंकणी भाषेतील काही उणिवा भरून काढण्याचे आव्हान आज समोर आहे. मात्र याचा अर्थ कोंकणी भाषेने प्रगती केली नाही, असे होत नाही. कोंकणीने बरीच प्रगती केली. परंतु त्याच्याकडे अपेक्षित अशा नेतृत्वाचा अभाव आहे. आजही मराठी, बंगाली तसेच अन्य भाषांच्या तुलनेत कोंकणी भाषिक लोकांची संख्या कमी आहे. यात वाढ होणे गरजेचे आहे. गोव्यात पोर्तुगिजांप्रमाणेच अनेकांच्या राजवटी झाल्या. या काळात त्यांच्याकडून सतावणूक होत असल्याने अनेक लोकांनी गोवा सोडून दुसऱ्या राज्यात आश्रय घेतला. त्यामुळे कोंकणी भाषेचा अपेक्षित विकास होऊ शकला नाही. गोवा मुक्तीनंतर कोंकणीचा विकास होऊ लागला, असे त्यांनी नमूद केले.
२५ लाख कोंकणी भाषिक
'गोव्याप्रमाणे कर्नाटक, केरळ या राज्यात राहत असलेल्या मूळ गोमंतकीयांनी कोंकणी भाषा टिकविण्याचे काम केले आहे. कोंकणी भाषिकांची नेमकी संख्या स्पष्ट नसली तरी ती २५ लाखांपर्यंत असू शकते' असे दामोदर मावजो यांनी सांगितले.
साहित्य वाचन करा
विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी लागावी. यासाठी विद्यार्थी तसेच तरुण वर्गाने कोंकणीसह अन्य विविध भाषांमधील पुस्तके तसेच साहित्याचे वाचन करावे, असे आवाहन दामोदर मावजो यांनी केले.