पेडणेनजीक खाजने बोगद्यात भींतीचा भाग कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 13:27 IST2020-08-06T13:27:10+5:302020-08-06T13:27:30+5:30
रेल्वे लोंढामार्गे वळविल्या

पेडणेनजीक खाजने बोगद्यात भींतीचा भाग कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्प
पणजी : पेडणेनजीक खाजने बोगद्यात भींतीचा काही भाग कोसळल्याने कोकण रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. गोवामार्गे येणाºया जाणाºया अनेक रेलगाड्या लोंढामार्गे वळविण्यात आलेल्या आहेत.
गोव्यात गेले पाच दिवस मुसळधार पाऊस सुरु असून मोसमी पावसाने इंचांचे शतक ओलांडले आहे. ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत. पेडणेनजीक असलेल्या या बोगद्यात काल मध्यरात्रीनंतर २.५0 च्या सुमारास अंदाजे ५ मिटर लांबीची भिंत रुळावर कोसळली. कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिलेल्या माहितीनुसार रुळावरील माती, दगड हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. कोणालाही इजा झालेली नाही. रेलगाड्या लोंढामार्गे वळविल्या आहेत.
एर्नाकुलम -हजरत निजामुद्दिन सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस, तिरुवअनंतपुरम सेंट्रल-लोकमान्य टिळक एक्सप्रेस, हजरत निजामुद्दिन - एर्नाकुलम सुपरफास्ट, एलटीटी टर्मिनस - तिरुवअनंतपुरम सेंट्रल या रेलगाड्या वळविण्यात आल्या आहेत. घाटगे म्हणाले कोविडमुळे अवघ्याच गाड्या चालू आहेत त्या लोंढामार्गे वळविल्या आहेत.