दिगंबर कामतांचा पराभव अन् काँग्रेस उमेदवाराचा विजय हेच ध्येय ठेवा: माणिकराव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:05 IST2025-04-07T11:05:15+5:302025-04-07T11:05:45+5:30

पक्षांतर करणाऱ्यांना काँग्रेस पक्षात यापुढे प्रवेश देणार नाही, असा निर्णय राहुल गांधी यांनी निर्णय घेतला आहे. येणाऱ्या काळात काँग्रेसच्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्यापूर्वी जनतेला विश्वासात घेतले जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले.

keep the defeat of digambar kamat and the victory of the congress candidate as the goal said manikrao thackeray | दिगंबर कामतांचा पराभव अन् काँग्रेस उमेदवाराचा विजय हेच ध्येय ठेवा: माणिकराव ठाकरे

दिगंबर कामतांचा पराभव अन् काँग्रेस उमेदवाराचा विजय हेच ध्येय ठेवा: माणिकराव ठाकरे

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : येथील विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करणे अत्यंत आवश्यक आहे. मडगाव मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांचा पराभव करून काँग्रेसच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्क्यांनी विजय मिळवून देणे हेच ध्येय ठेवा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.

मडगावमध्ये रविवारी संध्याकाळी ठाकरे यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेते आणि काँग्रेस समर्थकांची बैठक घेतली. यावेळी काँग्रेस पक्ष्याचे नेते सावियो डिसिल्वा, सावियो कुतिन्हो, राजन घाटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याचा व सर्वांनी मिळून काम करण्याचा कानमंत्र ठाकरे यांनी दिला.

काँग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये गेले आहेत. तरीही निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मडगावमध्ये काँग्रेस पक्ष जिवंत ठेवला आहे. काँग्रेसच्या उन्नतीसाठी आपल्याला पुढे जाण्याची आणि कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. कामत यांच्यासह सर्व पक्षांतर केलेल्यांना पराभूत करून त्यांच्या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार विजयी करण्याचे लक्ष्य ठेवा, असेही ते म्हणाले.

जनतेला विश्वासात घेऊनच उमेदवार जाहीर करू

जनतेला विश्वासात घेऊनच उमेदवार देऊन ठाकरे म्हणाले की, आमदार कामत यांनी मडगावच्या विकासाची कधीच पर्वा केली नाही. पक्षांतर करणाऱ्यांना काँग्रेस पक्षात यापुढे प्रवेश देणार नाही, असा निर्णय राहुल गांधी यांनी निर्णय घेतला आहे. येणाऱ्या काळात काँग्रेसच्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्यापूर्वी जनतेला विश्वासात घेतले जाईल. भाजपच्या राजकारण्यांमध्ये मतभेद आहेत. याचा फायदा आपण घेतला पाहिजे. जनसंपर्क वाढवून लोकांमध्ये परत एकदा विश्वास निर्माण केला पाहिजे, असे ठाकरे यांनी सांगितले.

पक्षबदलूंनी केला विश्वासघात : पाटकर

अमित पाटकर म्हणाले की, आठ दल बदलूंनी लोकांचा आणि पक्षाचा विश्वासघात केला. २०२२ मध्ये गोमंतकीयांच्या मोठ्या आशा होत्या, पण पुन्हा एकदा भाजप सत्तेत आला. पक्षांतर करणाऱ्यांनी काँग्रेस पक्षात दुसऱ्या फळीतील नेतृत्व कधीच तयार केले नाही. त्यामुळे आता आम्हाला पक्षाची सुरुवातीपासून बांधणी करावी लागणार आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या विजयाची टक्केवारी कमी केली आहे. २०२७ मध्ये मडगाव मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास पाटकर यांनी व्यक्त केला.

 

Web Title: keep the defeat of digambar kamat and the victory of the congress candidate as the goal said manikrao thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.