पंधरा दिवस आधीच सरकारी यंत्रणा सज्ज ठेवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 12:44 IST2026-03-06T12:44:03+5:302026-03-06T12:44:53+5:30

शिरगाव लईराई जत्रोत्सवाच्या तयारीला वेग, आमदार-अधिकाऱ्यांसह केली तयारीची पाहणी

keep government machinery ready fifteen days in advance said cm pramod sawant | पंधरा दिवस आधीच सरकारी यंत्रणा सज्ज ठेवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

पंधरा दिवस आधीच सरकारी यंत्रणा सज्ज ठेवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: शिरगाव श्री देवी लईराई जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जत्रेच्या १५ दिवस आधीच सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. जत्रोत्सवा दरम्यान कोणताही अपघात घडू नये यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी सकाळी आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या समवेत विविध खात्यांचे अधिकारी, देवस्थान समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांसोबत शिरगाव येथील मंदिर परिसर, होमकुंड परिसर, तळी तसेच गेल्यावर्षी ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली त्या रस्त्याची पाहणी करून सविस्तर आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी अंकित यादव, उपजिल्हाधिकारी शुभम नाईक, मामलेदार शैलेंद्र देसाई, पोलिस निरीक्षक विजय राणे, देवस्थान अध्यक्ष दिनानाथ गावकर, समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

या पाहणीवेळी आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही काही महत्त्वाच्या सूचना केल्या. देवस्थान समितीचे अध्यक्ष दिनानाथ गावकर, समिती सदस्य तसेच ग्रामस्थांनीही विविध सूचना मांडल्या. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत जत्रोत्सवाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच नियोजनासंदर्भात निर्देश देण्यात आले.

लवकरच भाविकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित

देवदर्शनासाठी वेगवेगळ्या रांगा ठेवणे, पर्यायी रस्त्याची व्यवस्था करणे तसेच इतर आवश्यक सुविधांचा अभ्यास करण्यात आला आहे. आगामी काही दिवसांत भाविकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात येणार आहेत.

भाविकांच्या जिवाची सरकारला काळजी

धोंड तसेच भाविकांच्या जिवाची सरकारला पूर्ण काळजी असून कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था तसेच इतर आवश्यक सुविधांसाठी व्यापक योजना राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यावर सरकारचा विशेष भर असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी भाविकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. गेल्या वर्षी सारखी घटना यापुढे कधीही घडू नयेत यासाठी सरकारने सर्व प्रकारची खबरदारी घेण्यास सुरुवात केली असून प्रशासनाला गेल्या सहा महिन्यांपासून तयारीचे आदेश दिले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गेल्या वर्षीची घटना दुर्दैवी असल्याचे सांगून यावर्षी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यायी रस्त्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे सहकार्य मिळाल्यास सुमारे पाच ते सहा कोटी रुपये खर्च करून बांध परिसरातील रस्ता पक्का करणे व दोन्ही बाजूंना संरक्षण भिंती उभारून भाविकांच्या ये-जा करण्याची स्वतंत्र व्यवस्था करणे शक्य होईल. - प्रेमेंद्र शेट, आमदार
 

Web Title : गोवा के मुख्यमंत्री ने शिरगाँव लईराई जत्रा की तैयारी जल्दी करने का आदेश दिया

Web Summary : गोवा के मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने शिरगाँव लईराई जत्रा के लिए 15 दिन पहले तैयारी करने का निर्देश दिया, सुरक्षा को प्राथमिकता। पिछली घटना के बाद, भीड़ प्रबंधन और भक्त सुरक्षा सुनिश्चित करने के लिए वैकल्पिक मार्गों और दिशानिर्देशों की योजना बनाई गई है, सरकार ने समर्थन का वादा किया है।

Web Title : Goa CM Orders Early Prep for Shirgaon Lairai Jatra

Web Summary : Goa CM Pramod Sawant directs officials to prepare 15 days ahead for Shirgaon Lairai Jatra, prioritizing safety. Following last year's incident, alternative routes and guidelines are planned to manage crowds and ensure devotee safety, with government support pledged.