शेतजमिनी सुरक्षित ठेवा; मुख्यमंत्री सावंत यांचे आवाहन, पर्यावरण रक्षणासाठी संघटित व्हावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 12:37 IST2025-04-06T12:35:37+5:302025-04-06T12:37:16+5:30

पर्यावरण रक्षणासाठी सरकार आणि जनतेने एकत्र आले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.

keep agricultural land safe said cm pramod sawant | शेतजमिनी सुरक्षित ठेवा; मुख्यमंत्री सावंत यांचे आवाहन, पर्यावरण रक्षणासाठी संघटित व्हावे

शेतजमिनी सुरक्षित ठेवा; मुख्यमंत्री सावंत यांचे आवाहन, पर्यावरण रक्षणासाठी संघटित व्हावे

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भावी पिढ्यांसाठी राज्यातील सखल भाग, कृषी क्षेत्रे, नो डेव्हलपमेंट झोन संरक्षित करण्यावर भर दिला. पर्यावरण रक्षणासाठी सरकार आणि जनतेने एकत्र आले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.

शनिवारी संध्याकाळी डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगाव येथील बहुउद्देशीय आपत्ती व्यवस्थापन चक्रिवादळ निवारा प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना सांगितले की, आपण गोमंतकीयांनी आपले सखल भाग, कृषी क्षेत्रे आणि नो डेव्हलपमेंट झोन नष्ट होण्यापासून संरक्षण करणे आवश्यक आहे. आपल्या भावी पिढ्यांसाठी आपण आपल्या पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे.

हवामान बदलामुळे देशाच्या किनारपट्टीवरील भाग चक्रीवादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तींनी प्रभावित होत आहेत. ही मानवनिर्मित आपत्ती आहे. "मला वाटते की अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जनता आणि सरकारने एकत्र आले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर आणि इतर नगरसेवक उपस्थित होते.

८५ कोटी खर्चुन ११ निवारा केंद्रे

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदर्शी नेते आहेत. त्यामुळे त्यांनी गोव्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मोठा निधी दिला आहे. सुमारे ८५ कोटी रुपये खर्च करून सुमारे ११ चक्रीवादळ निवारे बांधण्यात आले आहेत आणि सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यासाठी २५० कोटींचा वापर करण्यात आला आहे.

राज्यभर ५०० बंधारे बांधणार : शिरोडकर

जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, पंतप्रधानांनी देशातील सर्व मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांना २०४७ साठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन आम्ही जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि जलसंधारणासाठी बंधारे बांधण्यास सुरुवात केली आहे. लवकरच राज्यभरात आणखी ५०० बंधारे बांधण्याचा आमचा विचार आहे. दक्षिण गोव्याला पाणीपुरवठा सुधारण्यासाठी विभाग साळावली धरणावर १०० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्पही बांधणार आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले.

 

Web Title: keep agricultural land safe said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.