लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कर्नाटकने म्हादईसाठी एक पाऊल पुढे टाकत भंडुरा प्रकल्पासाठी खानापूरच्या चार गावांमधील ९.२७ एकर जमीन संपादित करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध डावलून कर्नाटकच्या राज्यपालांच्या सहीने ही अधिसूचना करण्यात आली आहे. यावरून म्हादईचे आणखी पाणी वळवण्यासाठी कर्नाटक ठाम असल्याचे दिसून येत आहे.
हुबळी - धारवाड, कुंडगोल आणि इतर भागांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी भंडुरा प्रकल्प आवश्यक असल्याचे नमूद करीत शेतकऱ्यांचा विरोध धुडकावून लावण्यात आला आहे. खानापूरच्या करंबळ, रूमेवाडी, शेडेगाळी, आसोगा आदी गावांमध्ये हे भूसंपादन होणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने म्हादई जल तंटा लवादाचा कार्यकाळ आणखी वर्षभराने वाढवला आहे. १६ ऑगस्ट रोजी कार्यकाळ संपला होता. गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र यांच्यात म्हादईच्या पाण्यावरून असलेल्या तंट्याबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी आता लवादाला एक वर्षाची मुदत मिळाली आहे.म्हादईबाबत गोवा विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाला होता. विरोधकांनी सरकार गंभीर नसल्याचा आरोपही केला होता.
खानापूरवासीयांचा विरोध
खानापूरमध्ये शेतकऱ्यांचा कळसा -भंडुरा प्रकल्प आणि भूसंपादन प्रक्रियेला विरोध आहे. बाधित शेतकऱ्यांनी नेरसा येथे सुरू असलेली कामे थांबवण्याची मागणी करून जोरदार निदर्शने केली होती. असोगा, मंतुरगा, रुमेवाडी आणि करंबळ येथील शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्यानंतर तेथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन केले होते. हा विरोध डावलून आता अधिसूचना काढण्यात आली आहे.
...तर कर्नाटकविरोधात अवमान याचिका
नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात म्हादईचा विषय आला होता, तेव्हा न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कर्नाटकविरोधात पुन्हा अवमान याचिका दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.