'सिंदूर'द्वारे पाकला अद्दल: मुख्यमंत्री सावंत; पर्वरीत तिरंगा यात्रा, सैनिकांच्या धाडसी कारवाईचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 09:53 IST2025-05-14T09:53:05+5:302025-05-14T09:53:31+5:30
माजी मुख्यमंत्री तथा देशाचे संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी खरेदी केलेल्या एस-४०० या शस्त्र आयुधांद्वारे विशेष कामगिरी केली, याचा आम्हाला अभिमान वाटतो.

'सिंदूर'द्वारे पाकला अद्दल: मुख्यमंत्री सावंत; पर्वरीत तिरंगा यात्रा, सैनिकांच्या धाडसी कारवाईचे कौतुक
लोकमत न्यूज नेटवर्क, पर्वरी : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केल्याबद्दल त्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंदूर ऑपरेशनद्वारे पाकिस्तान हद्दीत थेट घुसून दहशतवाद्यांचे तळ हवाई हल्ल्यांद्वारे उद्ध्वस्त केले. आमच्या सैनिकांनी, नौदल आणि हवाईदलाने संयुक्त कारवाई करून कामगिरी यशस्वी केली. आमची शूर सेना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. सिंदूर ऑपरेशन चालू राहणार असून पंतप्रधानांना पाठिंबा राहील, असे उद्गार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काढले.
पर्वरी मतदारसंघात मंगळवारी (दि.१३) मंत्री रोहन खंवटे आणि नागरिकांनी आयोजित केलेल्या सिंदूर तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री सावंत सहभागी झाले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री रोहन खंवटे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, जि.पं. सदस्य कविता नाईक, सरपंच स्वप्नील चोडणकर, सोनिया पेडणेकर, पर्वरी भाजप मंडळाचे अध्यक्ष विनीत परब, तिन्ही पंचायतीचे पंच सदस्य आणि शेकडोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
खंवटेंनी काढली पर्रीकरांची आठवण
मंत्री रोहन खंवटे यांनी आपल्या भाषणात पहलगाम येथील निष्पाप पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. आमच्या जवानांनी पाकिस्तानला धडा शिकवला असून पंतप्रधान मोदी यांच्या सिंदूर ऑपरेशनद्वारे दहशतवाद्यांचा खात्मा केला. माजी मुख्यमंत्री तथा देशाचे संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी खरेदी केलेल्या एस-४०० या शस्त्र आयुधांद्वारे विशेष कामगिरी केली, याचा आम्हाला अभिमान वाटतो. पंतप्रधान मोदी यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे, असेही मंत्री खंवटे म्हणाले.