नोकऱ्यांचा जॅकपॉट; मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीनंतर अवघ्या २४ तासांत भरती प्रक्रियेला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 08:00 IST2025-07-19T08:00:26+5:302025-07-19T08:00:26+5:30

राज्य कर्मचारी निवड आयोगाकडून तब्बल ४३९ पदांसाठी जाहिरात.

job jackpot recruitment process begins in just 24 hours after cm assurance | नोकऱ्यांचा जॅकपॉट; मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीनंतर अवघ्या २४ तासांत भरती प्रक्रियेला सुरुवात

नोकऱ्यांचा जॅकपॉट; मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीनंतर अवघ्या २४ तासांत भरती प्रक्रियेला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्य कर्मचारी निवड आयोगाने विविध सरकारी खात्यांमध्ये तब्बल ४३९ रिक्त पदांवर भरती जाहीर केली आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने भरतीची जाहिरात काढल्याने राज्यातील तरुणांसाठी नोकऱ्यांचा जॅकपॉट ठरणार आहे.

गुरुवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पाटो येथे आयोगाच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना रिक्त पदे शक्य तेवढ्या लवकर भरली जातील, असे जाहीर केले होते. या घोषणेला २४ तासही उलटले नसताना ४३९ पदे घोषित झालेली आहेत.

जाहीर झालेल्या पदांमध्ये २२ लेखापाल, ९ साहाय्यक राज्य कर अधिकारी, ३४ राज्य कर निरीक्षक, २५ कनिष्ठ अभियंता, ८८ कनिष्ठ अभियंता (विद्युत), १३२ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), १२ विस्तार अधिकारी, ३५ स्टेशन ऑपरेटर, ३ साहा. उपनिरीक्षक (वायरलेस ऑपरेटर), १ मेकॅनिक ग्रेड १ (डिझेल) पद, ५ कृषी साहाय्यक, १ इलेक्ट्रिशियन, ३५ वायरमन, ३१ मीटर रीडर, १ साहा. इलेक्ट्रिशियन, २ साहा. मेकॅनिक, २ साहाय्यक लाईट ऑपरेटर व १ मदतनीस या पदांचा समावेश आहे.

पुढील दोन वर्षांत राज्यातील सरकारी खात्यांमधील शक्य तेवढी रिक्त पदे भरण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. तशी जाहीर घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. २०२७मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याआधी तेवढी पदे भरली जातील. एका अधिकृत माहितीनुसार, विविध खात्यांमध्ये मिळून सुमारे ६,१४७ जागा रिक्त आहेत. यापैकी एक-तृतीयांश जरी पदे भरली तरी पुढील दीडेक वर्षात दोन ते अडीच हजार बेरोजगारांना सरकारी नोकऱ्या प्राप्त होतील, असा अंदाज आहे.

आयोग स्थापन झाल्यापासून भरती प्रक्रियेत पारदर्शकता आल्याचे मानले जात आहे. संगणाकाधारित परीक्षेचा निकाल लगेच प्राप्त होतो, त्यामुळे वशिलेबाजीला वाव मिळत नसल्याचे सांगण्यात येते. आतापर्यंत आयोगाने ७५२ पदांसाठी जाहिराती दिल्या व प्रक्रिया पूर्ण करून काही पदे भरलीही आहेत.

राज्य कर्मचारी निवड आयोगाने सुरवातीलाच एलडीसी व स्टेनोग्राफर मिळून २३२ पदांसाठी भरती प्रक्रिया हाताळली त्यानंतर आता ४३९ एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे भरण्याची आयोगाची ही दुसरी वेळ आहे. नोकऱ्या पैसे घेऊन नव्हे, तर गुणवत्तेच्या आधारावरच पारदर्शक पद्धतीने दिल्या जातात, असे आशादायी चित्र तरी सध्या निर्माण झाले आहे.

 

Web Title: job jackpot recruitment process begins in just 24 hours after cm assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.