सुदिन ढवळीकर यांना वगळून जीत आरोलकर यांना मंत्रिपद; मंत्रिमंडळाची फेररचना करण्याची तयारी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 12:57 IST2025-04-01T12:55:14+5:302025-04-01T12:57:15+5:30
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्लीत याविषयी केंद्रीय गृहमंत्री तसेच पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अमित शाह यांच्याकडून हिरवा कंदील घेतला असल्याची माहिती 'लोकमत'ला प्राप्त झाली आहे.

सुदिन ढवळीकर यांना वगळून जीत आरोलकर यांना मंत्रिपद; मंत्रिमंडळाची फेररचना करण्याची तयारी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून काढून जीत आरोलकर यांना मंत्रिपद देण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्लीत याविषयी केंद्रीय गृहमंत्री तसेच पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अमित शाह यांच्याकडून हिरवा कंदील घेतला असल्याची माहिती 'लोकमत'ला प्राप्त झाली आहे.
शनिवारी प्रियोळमधील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी भाजपला युतीची गरज नसल्याचे स्पष्टच सांगितले. प्रियोळ आणि मांद्रेच्या बाबतीत काडीचीही तडजोड केली जाणार नाही. मान्य नाही तर मगोपने चालते व्हावे, असा सडेतोड इशाराही सावंत यांनी दिला तेव्हाच सुदिन यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्याचे मुख्यमंत्र्यांनी निश्चित केल्याचे स्पष्ट झाले.
जीत मगोपचे आमदार असले तरी भाजपाला अत्यंत निकट आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर मगोपने युती तोडली तरी जीत मगो विधिमंडळ पक्ष भाजपात विलीन करू शकतात. ६ एप्रिल रोजी भाजपचा स्थापनादिन आहे. हा मुहूर्त साधून जीत यांना मंत्रिमंडळात घ्यायचे ठरले आहे. तत्पूर्वी जीत वेगळी चूल मांडून मगोप विधिमंडळ गट भाजपात विलीन करतील.
सर्व काही नियोजनबध्दरीत्या करण्याचे ठरले आहे. मुख्यमंत्री दिल्लीहून परतल्यानंतर या घडामोडींना वेग येईल. मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना वगळले जाणार आहे. आलेक्स सिक्वेराही यांनाही डच्चू देण्याचे ठरले आहे. त्या जागी दिगंबर कामत यांना मंत्रिमंडळात घेण्याचे ठरले आहे. दिगंबर यांच्याकडे वीज खाते देण्याचे निश्चित झाले आहे. कारण याआधी पर्रीकर सरकारमध्ये असताना दिगंबर यांनी वीज खाते बऱ्यापैकी हाताळले होते. मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात वीज खात्यासाठी सर्वाधिक ४१३१.१५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
सुदिनवर का नाराजी?
मडकई मतदारसंघात सुदिन भाजप कार्यकर्त्यांची कोणतीच कामे करत नाहीत, अशा वाढत्या तक्रारी आहेत. त्यात भर म्हणून अलीकडेच झालेल्या भाजप सदस्यता मोहिमेत मडकईत भाजपला दीड हजाराचा आकडाही पार करता आला नाही. सुदिन याचा आनंद लुटत आहेत. मध्यंतरी मडकई व फोंड्यात भाजप व मगो कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. एकीकडे भाजपला मडकईत हा वाईट अनुभव आला असताना दुसरीकडे नुवें मतदारसंघात मंत्री आलेक्स सिक्वेरा यानीही भाजपला सदस्यता मोहिमेसाठी कोणतीच मदत केली नाही. त्यामुळे सुदिन व सिक्वेरा यांची गच्छंती अटळ आहे.