जीत आरोलकर भाजपात आले तरी फरक पडणार नाही: दयानंद सोपटे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 07:45 IST2025-03-24T07:45:40+5:302025-03-24T07:45:45+5:30
उमेदवारीचा निर्णय पक्ष नेतृत्वच घेईल

जीत आरोलकर भाजपात आले तरी फरक पडणार नाही: दयानंद सोपटे
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'आमदार जीत आरोलकर भाजपमध्ये आले तरीही मला फरक पडणार नाही. भाजपसारखा अन्य कोणताही पक्ष आज सक्षम राहिलेला नाही. त्यामुळे प्रत्येकजण येऊ पाहत असतील. परंतु, शेवटी तिकीट कोणाला द्यावे, याबाबतचा निर्णय पक्ष नेतृत्वच घेणार आहे आणि माझ्यात कोणतीही कमतरता आहे, असे मला मुळीच वाटत नाही', असे मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे यांनी सांगितले.
आमदार आरोलकर यांची भाजपशी जवळीक वाढली आहे. जर कार्यकर्त्यांनी सांगितले तर आपण भाजपात जाण्यासंबंधीही विचार करू, असे जे विधान आरोलकर यांनी केले होते, त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, सोपटे म्हणाले की, 'भाजपमध्ये जेवढे लोक येतात, तेवढे येऊ देत. जीत आले तरीही मला फरक पडत नाही. लोकांना आज कळून चुकले आहे की, भाजपसारखा आज दुसरा कुठलाही सक्षम व ताकदवान पक्ष अस्तित्त्वात राहिलेला नाही. तिकीट कोणाला द्यावे हे पक्ष ठरवणार आहे. मी माझे काम चालूच ठेवले आहे. माझ्यात कोणतीच कमतरता आहे, असे मला मुळीच वाटत नाही.'
आरोलकर यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मांद्रे मतदारसंघात इव्हेंट्सचा सपाटा लावलेला आहे, त्याबद्दल विचारले असता माजी आमदार सोपटे म्हणाले की, 'पर्यटन विकास महामंडळाचा अध्यक्ष असताना मीदेखील मांद्रेत शिमगोत्सव, कार्निव्हल केला. वेगवेगळे कार्यक्रम समाजकारणाच्या आयोजित केले. माध्यमातून गोरगरिबांसाठी माझे काम चालूच आहे. मांद्रेतील लोकांनी मला तीनवेळा निवडून दिले. माझे कार्यकर्ते हीच माझी ताकद आहे.'