गोमेकॉत 'इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजी ओपीडी': मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 07:44 IST2026-04-03T07:43:47+5:302026-04-03T07:44:13+5:30
कर्करोग उपचारांना नवे बळ

गोमेकॉत 'इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजी ओपीडी': मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यातील कर्करोग उपचार अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि रुग्णाभिमुख करण्याच्या दिशेने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गोवा मेडिकल कॉलेज (गोमेकॉ) येथे लवकरच 'इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजी ओपीडी' सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. पर्वरी येथील सचिवालयात गुरुवारी आयुष वेलनेस सेंटरच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते.
यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, आरोग्य सचिव यतिंद्र मराळकर, संचालक डॉ. रूपा नाईक यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. या उपक्रमासाठी टाटा मेमोरियल इस्पितळ तसेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. या माध्यमातून कर्करोग रुग्णांना आधुनिक वैद्यकशास्त्रासोबत आयुर्वेद, जीवनशैली सुधारणा आणि पूरक उपचारांचा समन्वित लाभ मिळणार आहे.
'इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजी' संकल्पनेत निदान, उपचार आणि पुनर्वसन या सर्व बाबी एकाच छताखाली उपलब्ध होतात. ही सुविधा भविष्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे व कम्युनिटी हेल्थ सेंटर्सपर्यंत विस्तारली जाईल. त्यामुळे गोव्यातील रुग्णांना दर्जेदार उपचारासाठी बाहेरगावी जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होईल, असेही ते म्हणाले. सचिवालयातील वेलनेस सेंटरमुळे कर्मचाऱ्यांना योग, मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीचे मार्गदर्शन मिळणार असून, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयुष डॉक्टर उपलब्ध असणार आहेत.
'इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजी' म्हणजे काय ?
कर्करोग उपचारात आधुनिक औषधोपचारांसोबत आयुर्वेद, आहार नियोजन, योग, मानसिक आरोग्य व्यवस्थापन आणि पूरक उपचारांचा एकत्रित वापर म्हणजे 'इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजी'. यामुळे उपचारांची परिणामकारकता वाढण्यासोबतच रुग्णांच्या जीवनमानात सुधारणा होते.