आणीबाणीविषयक अडवाणींच्या त्या विधानातून प्रेरणा - भाजप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 20:30 IST2018-06-26T20:30:04+5:302018-06-26T20:30:18+5:30
देशात पुन्हा आणिबाणी लादली जाऊ शकते, अशा प्रकारची भीती व्यक्त करणारे विधान दोन-तीन वर्षापूर्वी भाजपचे राष्ट्रीय नेते लालकृष्ण अडवाणी यांनी करून देशात खळबळ उडवून दिली होती.

आणीबाणीविषयक अडवाणींच्या त्या विधानातून प्रेरणा - भाजप
पणजी - देशात पुन्हा आणिबाणी लादली जाऊ शकते, अशा प्रकारची भीती व्यक्त करणारे विधान दोन-तीन वर्षापूर्वी भाजपचे राष्ट्रीय नेते लालकृष्ण अडवाणी यांनी करून देशात खळबळ उडवून दिली होती. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस मुरलीधर राव यांनी मात्र अडवाणी यांच्या त्या विधानातूनच भाजपने प्रेरणा घेतली व आता देशभर आम्ही 1975 सालच्या आणीबाणीशीनिगडीत आठवणी जागविण्याचा कार्यक्रम करत आहोत, असे मंगळवारी येथे सांगितले.
मुरलीधर राव यांनी भाजपच्या पणजीतील कार्यालयात प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व खासदार नरेंद्र सावईकर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. घराणोशाही व लोकशाही एकत्र राहू शकत नाही. राहुल गांधी यांना फक्त काँग्रेसमधील घराणोशाहीमुळे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद मिळाले आहे. त्या पक्षाचा लोकशाहीवर विश्वास नाही. लोकशाही त्या पक्षात किंचित देखील नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना अंतर्गत लोकशाही प्रक्रिया राबविण्याबाबत अधिक जबाबदार करण्याचा मार्ग शोधून काढावा, असे आवाहन आम्ही करत असल्याचे राव म्हणाले. भाजप हा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे, ज्या पक्षात पूर्णपणो लोकशाही आहे, असेही राव म्हणाले. आणीबाणीविरुद्ध अडवाणी, वाजपेयी आदी अनेक नेते 1975 साली लढले. काँग्रेस सरकारने व तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी ती आणीबाणी लादली होती. सारा देश त्याविरुद्ध लढला. त्या संघर्षाबाबतचे विषय पाठय़पुस्तकात समाविष्ट करायला हवेत अशीही मागणी राव यांनी केली.
अडवाणी यांनी देशात पुन्हा आणीबाणी येऊ शकते असे विधान केले होते, असे पत्रकारांनी विचारताच मुरलीधर राव म्हणाले, की अडवाणी यांच्या त्या विधानातूनच आम्ही प्रेरणा घेऊन आता देशभर कार्यक्रम करत आहोत. या कार्यक्रमाच्यामागे अडवाणी यांचे विचार, स्फुर्ती व पाठींबा सर्व काही आहे. भारतीय जनता पक्ष कधीच कुठल्याच पक्षाला किंवा नेतृत्वाला किंवा नेत्याला देशात पुन्हा कधीच आणीबाणी लादू देणार नाही. लोकशाही हे भाजपचे प्राणत्त्व आहे. आम्ही कधीच कुणाला लोकशाहीवर हल्ला करू देणार नाही. केंद्रात काँग्रेसचे सरकार अधिकारावर असतानाच लोकशाहीवर सर्वाधिक हल्ले झाले. भाजपच्या तत्त्वज्ञानाचा आत्मा लोकशाही हाच आहे.
..........