पूल, बोगदे, सिग्नल यंत्रणांची तपासणी पूर्ण; कोकण रेल्वेची पावसाळ्यापूर्वीची मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 07:33 IST2026-03-16T07:33:31+5:302026-03-16T07:33:31+5:30
पावसाळ्यात रेल्वे सेवा विनाव्यत्यय आणि सुरक्षितपणे सुरू राहावी, यासाठी ही सज्जता तपासण्यात आली.

पूल, बोगदे, सिग्नल यंत्रणांची तपासणी पूर्ण; कोकण रेल्वेची पावसाळ्यापूर्वीची मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : पावसाळ्यातील आव्हानात्मक परिस्थिती लक्षात घेता, कोकण रेल्वे प्रशासनाने आपली वार्षिक तपासणी पूर्ण केली. पावसाळ्यात रेल्वे सेवा विनाव्यत्यय आणि सुरक्षितपणे सुरू राहावी, यासाठी ही सज्जता तपासण्यात आली.
कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष पाहणी मोहीम राबवण्यात आली. त्यांच्यासोबत विविध विभागांचे संचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ही पाहणी खालीलप्रमाणे दोन टप्प्यांत पार पडली. १० मार्च रोजी मडगाव ते ठोकूरदरम्यानचा विभाग, ११ मार्च रोजी मडगाव ते रोहादरम्यानचा विभाग तपासण्यात आला.
कोकणचा भौगोलिक भाग डोंगराळ आणि अतिवृष्टीचा असल्याने या मार्गावर विशेष खबरदारी घ्यावी लागते. या पार्श्वभूमीवर, अधिकाऱ्यांनी रेल्वे मार्ग, पूल, बोगदे, दरडी कोसळण्याची शक्यता असलेली ठिकाणे, सिग्नल यंत्रणा आणि पाणी साचण्याची संभाव्य ठिकाणे यांचा सखोल आढावा घेतला, स्थानकांमधील पायाभूत सुविधा, सौर ऊर्जेवरीव यंत्रणांचीही तपासणी करण्यात आली.
दुरुस्ती कामांचीही पाहणी
या दौऱ्यादरम्यान संवेदनशील ठिकाणी सुरू असलेल्या देखभाल दुरुस्तीच्या कामांची पाहणी करण्यात आली. सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेवर संतोष कुमार झा यांनी समाधान व्यक्त केले. कोकण रेल्वेच्या या अग्रेसर धोरणामुळे पावसाळ्यात प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होण्यास मदत होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.