दिवाळखोर सोसायट्यांची होणार चौकशी: सहकारमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 08:58 IST2023-11-19T08:57:30+5:302023-11-19T08:58:17+5:30
बार्देश उपनिबंधकांतर्फे म्हापसा येथे सहकार सप्ताहाचे आयोजन.

दिवाळखोर सोसायट्यांची होणार चौकशी: सहकारमंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा : उत्तर गोव्यातील पेडणे तसेच बार्देश तालुक्यातून ४७ सहकार सोसायट्या दिवाळखोरीत काढण्यात आल्या आहेत. त्यामागची कारणे स्पष्ट होण्यासाठी चौकशी करण्याचे आदेश सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिले आहेत. ७० व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त बार्देशमधील उपनिबंधकांतर्फे म्हापशात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
दिवाळखोरीत निघालेल्या संस्थांपैकी ३५ बार्देशात तर १२ पेडणे तालुक्यातील आहेत. यात विश्वासाने गुंतवणूक करणारे लोक हे सर्वसामान्य आहेत. म्हापसा अर्बन किंवा मडगाव अर्बन बँक दिवाळखोरीत निघणे हा त्या शहरावर लागलेला एक ठपका आहे. त्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ शकते. ती दूर होण्यासाठी दिवाळखोरीत निघण्यामागची कारणे शोधून काढली जाणार आहेत. तो अहवाल १५ दिवसात सादर केला जाईल, असेही मंत्री शिरोडकर यांनी यावेळी सांगितले.
मंत्री शिरोडकर म्हणाले, पेडणे तसेच बार्देश या दोन तालुक्यांतील १०३२ सहकार सोसायट्यांचा समावेश होतो. त्यातील ५०० हून जास्त हाऊसिंग क्षेत्रातील आहेत. हाऊसिंग सोसायट्या या वादविवाद होणारे अड्डे आहेत. त्यांच्यातील वादाचे पडसाद सहकार निबंधकांवर होतात. एकूण सोसायट्यांतील ११४ स्वयंसेवा संघटना आहेत. त्यात काम करणाऱ्या महिला अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात. त्यामुळे सहकार क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज शिरोडकर यांनी व्यक्त केली.
राज्यातील १२ तालुक्यांचे ६ विभाग तयार करण्यात आले आहेत. या सर्व विभागांचा अहवाल तयार करण्याचे काम सहकार खात्यामार्फत हाती घेण्यात आल्याची माहिती यावेळी दिली. तसेच दर सहा महिन्यांनी सोसायट्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती यावेळी दिली.
सहकार क्षेत्रात जास्तीत जास्त युवकांना सहभागी करून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तरच सहकार क्षेत्राची समृद्धी झाल्याचे म्हणावे लागेल. युवकांना सहकार क्षेत्रात उत्तेजन देण्यासाठी पुढील सहा महिन्यांत कोर्स सुरू केला जाणार असल्याची माहिती शिरोडकर यांनी दिली.
राज्यात डेअरी तसेच भाज्यांचे उत्पादन कमी असल्याने यात लोकांच्या गरजा भागविण्यासाठी दरवर्षी सुमारे ६०० कोटी रुपयांचा महसूल शेजारील राज्यांना द्यावा लागतो. त्यामुळे अशा क्षेत्राचे उत्पादन राज्यात घेऊन युवकांना मार्गदर्शन दिल्यास बराच लाभ होऊ शकतो, असेही शिरोडकर यावेळी म्हणाले.
यावेळी उपनिबंधक सीताराम सावळ, डॉ. अमृत नाईक, हरिश नाईक, नगराध्यक्षा प्रिया मिशाळ उपस्थित होते. कार्यक्रमात सहकार क्षेत्रात चांगले कार्य करणाऱ्या सोसायटी अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला. प्रकाश धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले.