मातृत्व-पितृत्वापासून वंचित रहाण्याचे गोव्यातील प्रमाण दहा टक्क्यांनी अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 04:10 PM2018-09-24T16:10:21+5:302018-09-24T16:11:43+5:30

राष्ट्रीय सरासरी दहा ते पंधरा टक्के असताना गोव्यातील प्रमाण 20 ते 25 टक्के. पतीची अनुपस्थिती आणि उशिरा होणारी लग्ने कारणीभूत असण्याची शक्यता

Infertility rate among Goan Couples in 10% higher than National rate | मातृत्व-पितृत्वापासून वंचित रहाण्याचे गोव्यातील प्रमाण दहा टक्क्यांनी अधिक

मातृत्व-पितृत्वापासून वंचित रहाण्याचे गोव्यातील प्रमाण दहा टक्क्यांनी अधिक

Next

मडगाव:  मातृत्व व पितृत्वापासून वंचित असलेल्या दाम्पत्यांचे प्रमाण गोव्यात राष्ट्रीय सरासरीपेक्षा दहा टक्क्यांनी अधिक असून त्यामुळे गंभीर सामाजिक समस्या निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. उशिरा लग्न होण्याचे प्रमाण आणि नोकरीनिमित्त पतीचे पत्नीपासून दूर राहणे या गोष्टी यासाठी कारणीभूत असण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.


उपलब्ध माहितीनुसार गर्भधारणोपासून वंचित असलेल्या दाम्पत्यांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण दहा ते पंधरा टक्के असताना गोव्यात मात्र हे प्रमाण 20 ते 25 टक्के एवढे जास्त आहे. यावर अजुन सखोल अभ्यास झालेला नसला तरी वरवर पहाता गोव्यातील सामाजिक लाईफस्टाईल त्याला कारणीभूत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

फोंडय़ातील नामांकित गायनेकॉलॉजिस्ट डॉ. जयंत कामत यांच्या मते, मिडल ईस्ट किंवा इतर देशात नोकरीसाठी जाण्याचे प्रमाण गोव्यात बरेच मोठे आहे. लग्न झालेले पुरुष वर्षातून एकदा किंवा दोनदा घरी येतात. अशा परिस्थितीत त्यांच्या पत्नींच्या गर्भधारणेचे प्रमाण कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यासंदर्भात अजुनही सखोल अभ्यास झालेला नाही हेही त्यांनी मान्य केले.
 
उशिरा लग्ने होण्याचे प्रमाणही गोव्यात अधिक असून अशा परिस्थितीत उशिरा लग्न झालेल्या महिलेची प्रजनन शक्ती कमी होण्याची शक्यताही डॉ. कामत यांनी व्यक्त केली. सर्वसाधारणरित्या महिलेची प्रजनन शक्ती वयाच्या 30व्या वर्षी कमी होऊ लागते. 35 वर्षापर्यंत या प्रजनन शक्तीत 40 टक्क्यांची घट होते. वयाच्या चाळीशीनंतर ती अधिकच कमी होते. गोव्यात सरासरी 35 ते 40 वयोगटात लग्ने होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे एकूण गर्भधारणेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. या शिवाय हार्मोनमध्ये झालेले असंतुलन, लैंगिक व्याधी यासारखी कारणेही गर्भधारणा कमी करण्यास कारणीभूत ठरतात. 

गोव्यात जहाजांवर काम करणाऱ्यांचे प्रमाणही बरेच मोठे आहे. जहाजाच्या इंजिनवर अभियंते किंवा तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्यांच्या प्रजनन शक्तीवरही जास्त वेळ गरम वातावरणाशी संपर्क आल्याने विपरित परिणाम होऊ शकतो. जास्त वेळ गरम वातावरणाशी संपर्क आल्यास त्या पुरुषाच्या शुक्राणूंच्या प्रमाणात घट होऊ शकते.


डॉ. केदार फडते यांच्या मतेही गोव्यात अपत्यहीन दाम्पत्यांचे प्रमाण 20 ते 25 टक्के असून बहुतेकवेळा उशिरा लग्न झाल्यामुळे असे होऊ शकते. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाचे गायनॅकोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. गुरुदास पेडणेकर यांनीही स्थिती गंभीर असल्याचे मान्य करताना गोव्यात साक्षरतेचे प्रमाण जास्त असल्याने अशी दाम्पत्ये लगेच वैद्यकीय उपचार करुन घेण्यास पुढे येतात. ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट असल्याचे ते म्हणाले. देशाच्या इतर भागात अशी जागृती दिसत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

Web Title: Infertility rate among Goan Couples in 10% higher than National rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.