राज्यात ४४५ कोटींच्या उद्योगांना मंजुरी, ८०० तरुणांना मिळणार नोकरीची संधी!; मुख्यमंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 13:24 IST2026-02-26T13:24:29+5:302026-02-26T13:24:29+5:30
गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने दिला हिरवा कंदील

राज्यात ४४५ कोटींच्या उद्योगांना मंजुरी, ८०० तरुणांना मिळणार नोकरीची संधी!; मुख्यमंत्र्यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या काल, बुधवारी झालेल्या ४१व्या बैठकीत ४४५ कोटींच्या उद्योगांना मंजुरी देण्यात आली असून याद्वारे ८०० जणांना नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, आमदार तसेच आयडीसीचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर पान माहिती देताना सांगितले की, अन्नप्रक्रिया, लॉजिस्टिक्स व वेअरहाउसिंग आणि उत्पादन क्षेत्रातील एकूण १० नव्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. ही मंजुरी राज्य सरकारच्या शाश्वत औद्योगिक वाढ, संतुलित प्रादेशिक विकास आणि रोजगार निर्मिती या धोरणाला बळकटी देणारी आहे. उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनिक प्रक्रिया सुलभ करणे, विविध खात्यांमधील समन्वय वाढवणे आणि पारदर्शक व गुंतवणूकदारांना अनुकूल वातावरण तयार करण्यावर सरकार भर देत असल्याचे सावंत यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, थिवी, पिसुर्ले व धारबांदोडा आदी सरकारी आद्योगिक वसाहतींमध्ये हे प्रकल्प येणार आहेत. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये सरकारने २१७.२५ कोटी रुपये गुंतवणुकीच्या दहा प्रकल्पांना मंजुरी दिली होती. हे प्रकल्प आयटी, लॉजिस्टिक्स व उत्पादन क्षेत्रातील होते व त्यातून ९४१ जणांना नोकऱ्या मिळणार होत्या. प्राप्त माहितीनुसार वेदांता कंपनीच्या तब्बल ७२२ कोटींच्या पाइप उत्पादन तसेच १५०० कोटींच्या फायबर प्रकल्पासह अन्य काही मोठ्या प्रकल्पांसाठी विशेष सवलतीचा विचार सरकार करत आहे.
सर्वांगीण विकासाला गती
गोव्यातील उद्योगाभिमुख वातावरण अधिक सक्षम करण्यासाठी इज ऑफ डुइंग बिझनेस सुधारण्याच्या दिशेने सातत्याने पावले उचलली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. जबाबदार गुंतवणूक आकर्षित करून राज्याच्या आर्थिक वाढीस चालना देणे, युवकांसाठी रोजगार निर्माण करणे आणि गोव्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले.