लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दर २४ तासाला सरासरी ५० रुग्ण गोमेकॉ किंवा उत्तर व दक्षिण जिल्हा इस्पितळांमध्ये पुढील उपचारांसाठी पाठवले जातात. याचाच अर्थ दर तासाला ३ रुग्ण वरील इस्पितळांमध्ये पाठवले जात आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे, कम्युनिटी हेल्थ सेंटर्स, अर्बन हेल्थ सेंटर्स व प्रायमरी अर्बन हेल्थ सेंटर्समधील सुविधांचा अभाव यातून स्पष्ट होतो.
याबाबत उपलब्ध आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, 'वाळपई, साखळी व डिचोली कम्युनिटी हेल्थ सेंटरमधून गेल्या दोन वर्षांच्या काळात सर्वाधिक रुग्णांना पुढील उपचारांकरिता गोमेकॉत पाठविण्यात आले आहेत. गोमेकॉ तसेच दोन्ही जिल्हा इस्पितळांवरील ताण दिवसेंदिवस वाढत चालला असल्याचे स्पष्ट होते. हा ताण कमी कसा करता येईल यावर विचार करण्याची गरज आहे.
कम्युनिटी सेंटरची स्थिती
वाळपई कम्युनिटी हेल्थ सेंटरमधून ३०४१ रुग्णांना गोमेकॉत तर २५० रुग्णांना उत्तर जिल्हा इस्पितळात पाठवले. साखळीतून अनुक्रमे रुग्ण ३४२९ गोमेकॉत तर ८५१ रुग्ण उत्तर जिल्हा इस्पितळात, डिचोलीतून १४३० रुग्ण गोमेकॉत तर १७२३ उत्तर जिल्हा इस्पितळात, पेडणेहून ३७२ रुग्ण गोमेकॉत तर रुग्णांना २११८ उत्तर जिल्हा इस्पितळात पाठवले. दक्षिण गोव्यात कुडचडे कम्युनिटी हेल्थ सेंटरमधून १५२२ तर काणकोण कम्युनिटी हेल्थ सेंटरमधून ४१४४ रुग्णांना दक्षिण जिल्हा इस्पितळात पाठवले.
आरोग्य केंद्रांवरूनही रुग्ण होतात रेफर
प्राथमिक आरोग्य केंद्रांमधूनही गोमेकॉसह उत्तर गोवा जिल्हा इस्पितळ, दक्षिण जिल्हा इस्पितळात रुग्ण पाठवले जातात. कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्रातून गोमेकॉत ७५४ तर उत्तर जिल्हा इस्पितळात ९४६ रुग्ण पाठवले. कासारवर्णेतून अनुक्रमे ७४ आणि ८६५, बेतकी खांडोळा येथून गोमेकॉत ११७३ रुग्ण, हळदोण्यातून अनुक्रमे १५७ आणि ८५१, पर्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रातून अनुक्रमे १८७ आणि ६८, साळगाव प्रा. आ. केंद्रातून अनुक्रमे ४५ आणि २९९, शिवोलीतून अनुक्रमे २७२ आणि ७४४, मयेंतून अनुक्रमे २२ आणि २४८, कोलवाळ आरोग्य केंद्रातून उत्तर जिल्हा इस्पितळात ८९, खोर्ली आरोग्य केंद्रातून गोमेकॉत ९८, चिंबल येथून गोमेकॉत ७५ रुग्ण पाठवले. म्हापसा अर्बन हेल्थ सेंटरमधून उत्तर जिल्हा इस्पितळात दोन वर्षांत २८६ रुग्णांना तर पणजी अर्बन हेल्थ सेंटरमधून दक्षिण जिल्हा इस्पितळात ७० रुग्णांना पाठवले.
दक्षिण गोव्यातील आरोग्यसेवेवरही ताण
दक्षिण गोव्यात बाळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्रातून दक्षिण जि. इस्पितळात ३७४५ रुग्ण पाठवले. चिंचोणेतून गोमेकॉत २३३ व दक्षिण जिल्हा इस्पितळात १२६०, कुठ्ठाळी प्राथमिक आरोग्य केंद्रातून अनुक्रमे १४४ आणि २८, धारबांदोड्यातून अनुक्रमे १३४९ आणि ६२३, कुडतरीतून द. जि. इस्पितळात ८०९, लोटलीतून गोमेकॉत २६, नावेलीतून द. जि. इस्पितळात ३७५, सांगेतून गोमेकॉत २ तर दक्षिण जि. इस्पितळात १६०६, शिरोड्यातून गोमेकॉत ७४ तर द. जि. इस्पितळात ५५९ व केपेंतून २४८८ रुग्णांना दक्षिण जि. इस्पितळात पाठवले.