खासगी बसने रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला चिरडले : मडगाव येथील घटना; चालक ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 16:53 IST2024-07-13T16:52:05+5:302024-07-13T16:53:14+5:30
मडगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोर एका भरधाव खासगी बसच्या धडकेत रस्ता ओलांडण्याच्या तयारीत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला.

खासगी बसने रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला चिरडले : मडगाव येथील घटना; चालक ताब्यात
तुकाराम गोवेकर, मडगाव : येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोर एका भरधाव खासगी बसच्या धडकेत रस्ता ओलांडण्याच्या तयारीत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. अपघातात तिच्या डोक्याला जबर मार लागून रक्तस्त्राव झाला. या प्रकरणी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे.
आज, शनिवारी घटना सकाळी १०.३० च्या सुमारास अपघाताची ही घटना घडली. शिला बोटेकर (वय ६०, रा. दिकरपाली-दवर्ली) असे मृत महिलेचे नाव आहे. तर उदय वडार (वय ३८) या चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. बोटेकर या यल्लमा देवीची भक्त असून डोक्यावर देवीची मूर्ती घेऊन जुन्या बस स्थानक परिसरातील दुकानदार, विक्रेत्यांकडून दक्षिणा घेऊन जात होत्या.
येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे रस्ता ओलांडून पालिका उद्यानाच्या दिशेने ते जात असताना काणकोणहून मडगाव कदंब बस स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूक बसची तिला जबर धडक बसली. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. मडगाव पोलिसांना घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले.
या प्रकरणी खासगी बस चालक उदय वडार (वय ३८) याला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच अपघातास करणीभूत बसही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मडगावचे पोलीस निरिक्षक तुळशिदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश शिरवईकर पुढील तपास करीत आहेत.