ऑगस्टमध्ये राजकीय सांजाव; अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळाच्या फेररचनेची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 13:28 IST2025-06-25T13:27:56+5:302025-06-25T13:28:25+5:30

दिल्लीतील नेत्यांचा निरोप

in august cabinet reshuffle likely after the session ends | ऑगस्टमध्ये राजकीय सांजाव; अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळाच्या फेररचनेची शक्यता

ऑगस्टमध्ये राजकीय सांजाव; अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळाच्या फेररचनेची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन जुलै महिन्यात सुरू होणार आहे. तर दि. ८ ऑगस्टला हे अधिवेशन संपेल. त्यानंतर लगेच ऑगस्टमध्येच राज्यात राजकीय सांजाव होईल. म्हणजेच अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ फेररचना करण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळातून दोघा-तिघांना डच्चू देऊन त्याजागी नव्या आमदारांना स्थान दिले जाईल, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, काल बहुतेक राजकारण्यांनी पारंपरिक सांजाव उत्सवाचा आनंद लुटला. काहींनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत सांजाव साजरा केला.

गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून मुख्यमंत्र्यांनी डच्चू दिला. त्यानंतर लगेच मंत्रिमंडळातील रिक्त जागा भरली गेलेली नाही. आता विधानसभा अधिवेशन सुरू होणार असल्याने मंत्रिमंडळात आता बदल नको, असा संदेश दिल्लीहून आलेला आहे. मंत्र्यांना आपापल्या खात्यांशी निगडीत प्रश्नांना अधिवेशनात उत्तरे देणे गरजेचे असते. आताच नवे कुणी मंत्री केले तर अधिवेशनात गोंधळ उडू शकतो. उत्तरे देणे जड जाऊ शकते. त्यामुळे तूर्त फेररचना शक्य नाही. येत्या ऑगस्ट महिन्यात मंत्रिमंडळाची फेररचना होईल. कारण सध्याच्या मंत्रिमंडळाला घेऊन २०२७ च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणे धोक्याचे ठरेल याची कल्पना भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांना दिलेली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याच नेतृत्वाखाली २०२७ ची निवडणूक होईल. पण मंत्रिमंडळात तीन-चार नवे मंत्री असतील. त्यामुळे या फेरबदलाकडे राजकीय नेत्यांसह गोमंतकीयांचे लक्ष लागले आहे.

गोविद-सीएमचे हस्तांदोलन

आमदार गोविंद गावडे काल सायंकाळी कला अकादमीत सोहळ्यासाठी आले होते. तिथे मुख्यमंत्री सावंत यांनाही ते भेटले व मुख्यमंत्री समोर येताच त्यांनी मुख्यमंत्र्यांशी हस्तांदोलन केले. मात्र, यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर मनापासून आनंद नव्हता, असे लोकांनाही जाणवले.
 

Web Title: in august cabinet reshuffle likely after the session ends