IFFI 2019 opening ceremony: Rajinikanth receives Icon of Golden Jubilee award | लोकांच्या उपकारातच राहीन - अमिताभ बच्चन; इफ्फीचे शानदार उद्घाटन 
लोकांच्या उपकारातच राहीन - अमिताभ बच्चन; इफ्फीचे शानदार उद्घाटन 

- सदगुरू पाटील

पणजी : जनतेने मला खूप प्रेम दिले. जनतेच्या मोठय़ा उपकारामध्ये मी आहे आणि या उपकारातच राहणे मी पसंत करीन, अशा शब्दांत बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शंकर महादेवनच्या जादुई संगीताचा आविष्कार, दक्षिणोतील सिनेमांचा देव असलेल्या रजनीकांतला आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबली पुरस्कार आणि नामवंत सिने कलाकारांची दिमाखदार उपस्थिती अशा वातावरणात बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात बुधवारी पन्नासाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) शानदार उद्घाटन झाले.

अमिताभ बच्चन, रजनीकांत, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई, माहिती व प्रसारण मंत्रलयाचे सचिव अमित खारे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत समई प्रज्वलित करून इफ्फीचे उद्घाटन करण्यात आले. 

अमिताभ बच्चन यांना प्रकाश जावडेकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते शाल व भेटवस्तू प्रदान करून गौरविण्यात आले. खास निमंत्रित या नात्याने बोलताना अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मला मोठा सन्मान मिळाला याचा आनंद वाटतो. हा तर आई वडिलांचा आशीर्वाद आहे. पण माझ्या यशाचे श्रेय माझे सिने निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार यांना जाते आणि सर्वात मोठे श्रेय सर्व जनतेला प्राप्त होते. चाहत्यांच्या उपकारातून मी कधी बाहेर येऊ शकणार नाही, असे अमिताभ बच्चन यांनी नमूद केले.

रजनीकांतविषयी बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले, 'रजनीकांत हे माझा कुटुंबाचा सदस्य असल्याप्रमाणेच आहेत. आम्ही दोघेही एकमेकांना अनेक विषयांबाबत सल्ले देत असतो. काहीवेळा आम्ही एकमेकांचे सल्ले मान्य करत नाही ही वेगळी गोष्ट आहे. रजनीकांत हे खूप नम्र स्वभावाचे आहेत. खूप नम्र अशाच पार्श्वभूमीतून ते पुढे आले आहेत'.

प्रकाश जावडेकर व अमिताभ बच्चन यांच्या हस्ते आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबली पुरस्कार रजनीकांतला देऊन सन्मानित करण्यात आले, तेव्हा पूर्ण सभागृहाने उभे राहत व टाळ्य़ा वाजवत प्रतिसाद दिला. माझे प्रेरणास्थान अमिताभ बच्चन आहेत. मी मला मिळालेला पुरस्कार माझे सिने निर्माते, दिग्दर्शक, तांत्रिक कर्मचारी आणि तमाम चाहत्यांना प्रदान करतो, असे रजनीकांत म्हणाले.

प्रकाश जावडेकर  यांनी आपल्या भाषणातून भारतीय सिने उद्योगाचा थोडक्यात आढावा घेतला. सिनेमांनी भारतीय सिने रसिकांचे जीवन घडविले आहे. प्रत्येकाच्या जीवनात सिनेमांनी आनंदाचे कारंजे फुलविले. उत्साहाचे सिंचन केले. दिव्यांगांना देखील सिनेमाचा पूर्णपणे अनुभव घेता यावा म्हणून गोव्यात चित्रपट तयार केला गेला व तो इफ्फीत दाखविला जाईल, असे प्रकाश जावडेकर म्हणाले. चित्रपटाच्या शूटींगसाठी सगळ्य़ा प्रकारचे परवाने जलद मिळावेत म्हणून एक खिडकी योजना अस्तित्वात आणली जाईल. याचा लाभ गोव्यासह अंदमान निकोबार व लेहलडाखलाही होईल, असे प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचेही भाषण झाले. पाहुणचारासाठी गोमंतकीय प्रसिद्ध आहेत. इफ्फीच्या सर्व प्रतिनिधींनी या पाहुणचाराचा लाभ घ्यावा. भारतात वार्षिक दोन हजार चित्रपटांची निर्मिती होते. गोवा हे सिनेमाच्या शूटींगसाठी प्रसिद्ध स्थळ आहे. यापुढे गोवा सरकार फिल्म पर्यटनावर भर देईल व चित्रपटासाठीच्या साधन-सुविधांचाही दर्जा वाढविल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

इजाबेल हुपर्ट हिला जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ज्युरी मंडळाचे चेअरमन जॉन बेले यांचाही सत्कार करण्यात आला. रमेश सिप्पी, एन चंद्रा, श्रीराम यांचाही मान्यवरांनी सत्कार केला. डिस्पाईट द फॉग हा इटालियन सिनेमा उद्घाटनावेळी दाखविला गेला. या सिनेमातील प्रमुख कलाकार व दिग्दर्शकाला व्यासपीठावर बोलावून गौरविले गेले. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रलयाने गोवा मनोरंजन संस्थेच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात पुढील आठ दिवस 76 देशांतील एकूण दोनशे चित्रपट दाखविले जाणार आहेत.

महादेवन यांनी मने जिंकली...
शंकर महादेवन यांनी अनेक संगीतकारांना सोबत घेऊन कार्यक्रम सादर केला. तो प्रेक्षकांना खूप भावला. बच्चन, रजनीकांत, जावडेकर आदी सर्व मान्यवरांनी उभे राहून टाळ्य़ा वाजवत महादेवन यांच्या कार्यक्रमाला दाद दिली. अनेक देशांतील संगीताचे फ्युजन महादेवन यांनी सादर केले. सूर निरागस हो हे गाणोही महादेवन यांनी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्ताने वैष्णव जन तो..हे प्रसिद्ध भजनही सादर केले गेले, तेव्हा प्रेक्षकांनी सूर धरला.

पर्रीकरांचे स्मरण 
माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांनी इफ्फीसाठी व गोव्यासाठी दिलेल्या योगदानावर आधारित माहितीपट उद्घाटन सोहळ्य़ावेळी दाखविला गेला. सोहळ्य़ाला उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, बाबू आजगावकर आदी मंत्री उपस्थित होते. करण जोहर यांनी सूत्र संचालन केले.
 

Web Title: IFFI 2019 opening ceremony: Rajinikanth receives Icon of Golden Jubilee award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.