इच्छा असल्यास मार्ग सापडेल: मंत्री दिगंबर कामत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 08:11 IST2025-08-22T08:10:22+5:302025-08-22T08:11:40+5:30
पिंपळकट्टा येथील देव दामोदराचे घेतले दर्शन.

इच्छा असल्यास मार्ग सापडेल: मंत्री दिगंबर कामत
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : आमदार दिगंबर कामत यांनी मडगाव पिंपळकट्टा येथील देव दामोदराचे दर्शन घेतले. त्यावेळी पत्रकारांजवळ बोलताना ते म्हणाले, जर इच्छा असेल, तर मार्ग आपोआप सापडतो, असेही मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले.
आपण साडेतेरा वर्षे आमदार होतो. दिगंबर कामत यांना मंत्रिपद असले काय, नसले काय, तरीही काहीच फरक पडला नाही. मंत्री नसतानाही लोक आपल्याजवळ आशेने येतात, त्यांची कामे आपण शक्य होईल तशी करून देतो. आपल्या कार्यकर्त्यांना तसेच मतदारांना वाटत होते की, आपल्याला मंत्रिपद मिळाले, तर कामे चांगली होतील. देवाने त्यांची मागणी ऐकली आणि आपल्याला मंत्रिपद मिळाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे गोवा प्रभारी बी.एल संतोष, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पाठपुरावा करून आपल्याला मंत्रिपद मिळवून दिले. राजभवन येथे शपथविधीही झाला. मी स्वतः, तसेच रमेश तवडकर आम्ही दोघे मंत्री झालो. पक्षाने सिग्नल दिला आणि आम्ही दोघे मंत्री झालो. त्याचा फायदा पक्षाला होईल. कारण, आमचे दोघांचेही सर्वसामान्य लोकांजवळ चांगले संबंध आहेत.
मडगाव न्यू मार्केट ट्रेडर्स संघटनेचे अध्यक्ष गोपाळ नाईक यांनी गेली १४ वर्षे आम्ही वनवासात होतो त्यातून आम्ही मुक्त झालो, असे सांगितले व न्यू मार्केट ट्रेडर्स संघटनेच्यावतीने स्वागत करून अभिनंदन केले.
वेळेचे नियोजन करू
आचारसंहिता लागू झाल्यावर कामे करण्यासाठी आपण वेळ कसा काढणार? यावर उत्तर देताना कामत यांनी वेळ कसा काढावा, हे आपल्याला चांगले माहीत आहे. यापूर्वी आपण मोठमोठे प्रश्न सोडवले आहेत. काम करण्याची इच्छाशक्ती पाहिजे, मार्ग आपोआपच सापडतो, असे कामत म्हणाले.