लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आदिवासी समाजाशी रक्ताचे नाते असलेले आले व गेले. माझे एस.टी. समाजाकडे रक्ताचे नाते नसले तरी सामाजिक आणि भावनिक नाते निश्चितच आहे. मी नेहमीच मनापासून या समाजासोबत आहे. सरकारने अनेक योजना त्यांच्यासाठी आणल्या, असे म्हणत टीका करणाऱ्यांना उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी काल, गुरुवारी तडाखेबंद भाषण केले.
धरती आभा जनभागीदारी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या कारकिर्दीत एस.टीं. साठी आणलेल्या योजना तसेच इतर उपक्रमांचा पाढाच वाचला. कार्यक्रमास केंद्रीय आदिवासी व्यवहारमंत्री जुआल ओराम, सभापती रमेश तवडकर, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, आमदार डॉ. गणेश गावकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, २०१९ मध्ये आदिवासी आयोग स्थापन करून रमेश तवडकर यांची आयुक्तपदी नियुक्ती केली, त्यानंतर आदिवासी महामंडळ स्थापन केले व वासू मेंग गावकर यांना या महामंडळावर नेमले. माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत प्रथमच आदिवासी संशोधन केंद्र सुरू केले. एस.टी. समाजाच्या आरोग्याच्या समस्या होत्या,त्यावर उपाययोजना केल्या.
सांगेतील रिसर्च सेंटरमध्ये संस्कृती संशोधनही सुरू झाले. फर्मागुडी येथे थोड्याच दिवसांत आदिवासी म्युझियम सुरू होणार आहे. एस.टी. समाजातील स्वातंत्र्यसैनिकांनी गोव्याच्या मुक्तीसाठी योगदान दिले आहे. त्यांचा परिचय येथे मिळेल. आदिवासींची कुणबी साडी लुप्त झाली होती, ती कुणबी साडी व शाल तसेच ट्रायबल जॅकेट लोकांसमोर आणले. १० कोटी रुपये खर्चुन कुणबी ग्राम उभारण्यात येत असून, तीन महिन्यांत हे काम पूर्ण होईल. १० हजार वननिवासी हक्क दावे प्रलंबित होते, हे दावे लवकर निकालात सरकार काढणार आहे.
आदिवासी सक्षमीकरणाच्या या ऐतिहासिक मोहिमेत गोवा अभिमानाने सामील होत आहे. जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत २५ गावे आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. १४ जूनपासून ३ हजार २ २५८ वननिवासी हक्क दावे सोडविण्यात आले आहेत आणि १००७ सनदा जारी करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिक्षणापासून वारशापर्यंत गोवा आदिवासी समावेशन आणि प्रगतीच्या एका नवीन युगाची सुरुवात करत आहे, यावर मुख्यमंत्र्यांनी प्रकाश टाकला.
एसटींसाठी मोफत बस...
सांगे भागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दोन - स्कूल बसेस जिल्हा खनिज निधीतून उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. समाजाच्या विद्यार्थ्यांना या बसमधून आता मोफत प्रवास करता येईल. तसेच वाहतुकीची सोय नाही किंवा पैसे नाहीत, यामुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही, हे सरकार पाहील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
तवडकरांचाही निशाणा
सभापती रमेश तवडकर यांनी कोणाचेही थेट नाव न घेता निशाणा साधला. तवडकर म्हणाले की, भाजपने आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी स्वतंत्र खाते स्थापन करून विविध योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. भाजपने तयार केलेल्या पीचवर खरे म्हणजे भाजप कार्यकर्त्यांनी बॅटिंग करायला हवी होती; परंतु मधल्या काळात भाजपशी संबंध नसलेला व अस्तित्वहीन कोणीतरी आला आणि फारसे काही न करता निघून गेला. अशा लोकांची मला कीव येते.