आपण नाराज नाही, खात्यांबाबत पूर्ण समाधानी; कला व क्रीडा मंत्री रमेश तवडकर यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 12:01 IST2025-09-19T12:00:59+5:302025-09-19T12:01:16+5:30
अमुकच खाती मिळायला हवीत, अशी कोणतीही आशा नाही. जी खाती मला मिळाली आहेत, त्यातूनच चांगले करून दाखवीन, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपण नाराज नाही, खात्यांबाबत पूर्ण समाधानी; कला व क्रीडा मंत्री रमेश तवडकर यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या खात्यांबद्दल मी पूर्णपणे समाधानी असून कोणतीही नाराजी नाही. मुळात कोअर कमिटीची बैठकच झालेली नसून खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत,' असे कला व संस्कृती तथा क्रीडा व आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांनी स्पष्ट केले.
'मला कुठल्याही गोष्टीची आसक्ती नाही. दीड वर्षाचा कार्यकाळ राहिल्याने आता मंत्रिपद नको, असे मी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितले होते. अमुकच खाती मिळायला हवीत, अशी कोणतीही आशा नाही. जी खाती मला मिळाली आहेत, त्यातूनच चांगले करून दाखवीन, असे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेस जिल्हा पंचायत अध्यक्ष धाकू मडकईकर आणि तियात्र अकादमीचे अध्यक्ष अॅन्थनी बाबर्बोझा उपस्थित होते. तवडकर म्हणाले की, 'मी राजीनामा देणार असल्याचे वृत्त पूर्णपणे खोटे आहे. ते म्हणाले की, तीन-चार दिवस मी वैयक्तिक कामासाठी बंगळुरूला होतो. त्या काळात कोअर कमिटीची कुठलीही बैठक झालेली नाही. त्यामुळे बैठकीत नाराजी व्यक्त करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मंत्रिमंडळ बैठकीस मी उपस्थित राहू शकलो नाही. कारण त्यावेळीही मी बंगळुरूला होतो.
तवडकर म्हणाले की, २००५ साली मी आमदार बनलो. त्यानंतर केवळ एक निवडणूक सोडली तर बाकी सर्व निवडणुकांमध्ये मी विजयी ठरलो. १९९६ पासून मी आदिवासी चळवळीत आहे. मी माझ्याकडील खात्याबाबत अजिबात नाराज नाही. मी नाराज असल्याचे चुकीचे वृत्त पसरवण्यात आले होते.
उपक्रमांतून लोक जोडले
तवडकर म्हणाले की, 'माझी कामगिरी व क्षमतेबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. केवळ मंत्री म्हणूनच नव्हे तर श्रमधाम संकल्पनेंतर्गतही गरीब, गरजूंना मोफत घरे बांधून देण्याचा उपक्रम मी चालवतो. आतापर्यंत ७० घरे बांधली. लोकोत्सवाच्या माध्यमातून लोक जोडले. बलराम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तळागाळात पोहोचलो. मी आदिवासी समाजातून आलो आहे. दिवंगत मनोहर पर्रीकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, श्रीपाद नाईक, राजेंद्र आर्लेकर यांच्यासोबत काम केले. माझी स्वतःची विचारधारा व तत्त्वे आहेत असे त्यांनी सांगितले.
'माती दिली तरी सोने करीन'
तवडकर म्हणाले की, 'माझ्या कार्यक्षमतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. माती दिली तरी त्याचे सोने करण्याची माझी क्षमता आहे. पुढील दीड वर्षाच्या काळात तीन वर्षांत होईल एवढे काम मी करून दाखवेन.'
पक्षादेश शिरसावंद्य मानला
तवडकर म्हणाले की, 'मी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटून दीड वर्षांचा कार्यकाळ राहिल्याने आता मंत्रिपद नको, असे सांगितले होते. सभापती म्हणून जबाबदारी सांभाळताना मी पदाची शान वाढवली. सभापतिपदी कायम ठेवले असते तरी चालले असते; परंतु पक्षाने माझ्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व पक्षाच्या इतर नेत्यांनी मंत्रिपद स्वीकारण्याचा आग्रह धरला. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून मी मंत्रिपद स्वीकारले. अमुकच खाती मिळायला हवीत अशी माझी कोणतीही आशा नाही. जी खाती मला मिळाली मिळाली आहेत त्यातूनच चांगले करून दाखवीन. खात्यांसाठी लागणारा निधी मिळवेन.'