विरोधकांपर्यंत सुलेमानचा व्हिडीओ कसा पोहोचला? भाजपचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2024 12:43 IST2024-12-18T12:43:10+5:302024-12-18T12:43:51+5:30
सरकारला टार्गेट केल्याचा आरोप

विरोधकांपर्यंत सुलेमानचा व्हिडीओ कसा पोहोचला? भाजपचा सवाल
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सिद्दीकी उर्फ सुलेमानचा व्हिडिओ विरोधकांपर्यंत कसा पोहचला? व्हिडिओ कुणाच्या सांगण्यावरुन तयार केला याचा तपास करा, अशी मागणी प्रदेश भाजपने मंगळवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. विरोधकांकडून व्हिडिओचा वापर सरकारला टार्गेट करण्यासाठी केला जात आहे. जनतेने अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये. या प्रकरणाचा तपास योग्य दिशने सुरू आहे. सत्य लवकरच समोर येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रदेश भाजप प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर म्हणाले, 'नोकऱ्यांसाठी पैसे, भू- बळकाव प्रकरणाचा तपास करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला होता. मुख्यमंत्र्यांनी भू बळकाव प्रकरणाचा तपासासाठी एसआयटी स्थापन केली. सरकरने नेहमीच अशा गोष्टींबाबत कडक भूमिका घेतली आहे. मात्र आता विरोधक सुलेमानच्या व्हिडिओवरुन राजकारण करीत आहे. सरकारला ते टार्गेट करीत आहेत.'
आमदार दाजी साळकर म्हणाले की, विरोधक सरकारला टार्गेट करीत आहे. सुलेमानविरोधात राज्यातीलच नव्हे तर देशातील विविध पोलिस स्थानकांमध्ये वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गुन्हे नोंद आहेत. तो सराईत गुन्हेगार आहे. सुलेमानचा व्हिडिओ कोणी काढला, त्याने कुणाच्या सांगण्यावरुनहा व्हिडिओ तयार केला, तो विरोधकांपर्यंत कसा पोचला असे प्रश्न आहेत. सुलेमानने व्हिडिओ विरोधी पक्षाच्या ज्या नेत्याला पाठवला, तो सध्या राज्यात नाही. नेमका त्याचवेळी तो नेता राज्याबाहेर कसा गेला याचा तपास व्हावा.
साळकर म्हणाले की, 'खरेतर भू बळकाव प्रकरणी तपासात सरकारनेच पुढाकार घेतला. विरोधकांच्या नाटकाला जनतेने बळी पडू नये. आमचा पोलिसांच्या तपासावर पूर्ण विश्वास आहे.' यावेळी उत्तर गोवा जिल्हा पंचायत सदस्य तथा भाजप नेता सिद्धेश नाईक उपस्थित होते.