पावसाचा तडाखा, शेतीची हानी, दिवसभर संततधार; रस्ते तुंबले, ठिकठिकाणी झाडे कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 08:52 IST2025-10-30T08:52:25+5:302025-10-30T08:52:52+5:30
छप्पर उडाले, जनजीवन विस्कळीत

पावसाचा तडाखा, शेतीची हानी, दिवसभर संततधार; रस्ते तुंबले, ठिकठिकाणी झाडे कोसळली
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पावसाने बुधवारी संपूर्ण दिवस थैमान घालून राज्यातील जनजीवन विस्कळीत केले. वाऱ्याबरोबर आलेल्या जोरदार पावसामुळे घराचे छप्पर कोसळणे, गाड्या चिखलात रुतणे, पाणी तुंबून वाहतुकीला अडथळा होणे आणि झाडांची पडझड यांसारखे प्रकार घडले.
शक्ती चक्रीवादळ ओसरल्यानंतर लगेच बंगालच्या उपसागरात मांथा चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे जोरदार पाऊस पडत आहे. त्यात आणखी भर म्हणून अरबी समुद्रात गोवा किनारपट्टीपासून साडेपाचशे किलोमीटर अंतरावर एक कमी दाबाचा पट्टाही निर्माण झाला असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडत आहे. कमी दाबाचा पट्टा हा इशान्येकडे सरकत असून, गोवा किनारपट्टीपासून लांब जात आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव ओसरत जाणार आहे.
मंगळवारी संध्याकाळी आंध्र किनारपट्टीला धडक देऊन भूभागात शिरलेले बंगालच्या उपसागरांतील मंथा चक्रीवादळही जमिनीवर पोहोचल्यानंतर मंदावले आहे. या वादळाचा वेग आता ताशी १५ किलोमीटर असा झाला आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव आता कमी होणार आहे, परंतु अरबी समुद्रातील घडामोडी राज्याला पुन्हा बाधक ठरून पाऊस लांबू शकतो.
दरम्यान, बुधवारी सकाळपासून पडलेल्या पावसामुळे भातपिकांचे आणखी नुकसान झाल्याची माहिती सर्व भागांतून मिळत आहे. पक्व झालेली पिके पावसांमुळे कोलमडून पडली आहेत. त्यामुळे ती आता कापणीसाठीही समस्या निर्माण होणार आहे. आडवी झालेल्या पिकांवर ट्रॅक्टर चालविणे हे कठीण काम असते. शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसानीची पाहणी करण्याचा आदेश कृषी खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. लोकांकडून नुकसान भरपाईची मागणीही होत आहे.
बार्देश तालुक्यात शेतांमध्ये गुडघाभर पाणी
बार्देश तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागातील भातशेतीत गुडघाभर पाणी साचल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ज्यांनी कापणी केली ते शेतकरी भात घरी नेऊ शकले नाहीत, तर भात कापणी यंत्र उपलब्ध न झाल्याने अनेक ठिकाणी कापणी झालेली नाही. तालुक्यातील साळगाव, कामुर्ली, मयडे, नास्नोळा, हळदोणा, खोर्जुवे, उसकई, पोंबुर्का भागात कापणी न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
आज पावसाचा जोर कमी
समुद्र अजूनही खवळलेलाच आहे. त्यामुळे मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न उतरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, गुरुवारी मात्र पावसाचा जोर कमी असणार आहे, तसेच गुरुवारसाठी कोणताही अलर्ट हवामान खात्याकडून जारी केलेला नाही.
मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कृषी खात्याला अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते. तलाठ्यांमार्फत गावागावातील शेतीचा आढावा घेऊन शेती अधिकारी व तलाठ्यांमार्फत नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, अवकाळी पावसामुळे भात शेतीबरोबरच कुळागार, बागायती पूर्णपणे धोक्यात आली असून सुपारीचे पीक पूर्णपणे नष्ट होण्याची भीती आहे.
राजधानीला पावसाचा फटका
गेल्या चार दिवसांपासून राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. बुधवारी या पावसाचा जास्त फटका पणजीला बसला. सर्वच रस्त्यांवर पाणी साचले. त्यामुळे लोकांना ये-जा करणेही कठीण बनले.
संततधार पावसामुळे वाहतूक मंदावली. बुधवारी सकाळी बहुतांश रस्त्यावर पाणी साचले होते. शहरातील १८ जून रस्ता, मध्यवर्ती बसस्थानक, मळा, पाटो परिसरात पाणी साचले होते. या रस्त्यांवर दुचाकी चालकांचा खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघात झाला.
घरे, दुकानांत पाणी
पणजीत मुसळधार पावसाने काही लोकांची घरे, दुकानांत पाणी शिरले. अटल सेतूवर मुसळधार पावसाने पाणी साचले. त्यामुळे वाहन चालवताना अनेक ठिकाणी अडचणी आल्या. पावसाबरोबर वेगवान वाराही सुटला होता. सत्तरी तालुक्यात एका घराचे छप्पर कोसळल्यामुळे ते कुटुंब संकटात सापडले आहे. ताळगाव-पणजी येथे रस्त्यावरील चिखलात ट्रक अडकला. पोरस्कडे-पेडणे येथे अपघात झाला.
बोडणवाडा-सालेली येथे घराचे छत कोसळले
संततधार पावसामुळे सालेली-भोडणवाडा येथील राजाराम गावकर यांच्या घराचे छप्पर कोसळून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे घराच्या इतर भिंती भिजून कमकुवत बनण्याची शक्यता निर्माण झाली. बुधवारी सकाळी १० च्या दरम्यान ही घटना घडली गावकर यांच्या या घराचे एका बाजूचे छप्पर पूर्णपणे कोसळले. गावकर यांच्यावर ओढवलेल्या संकटाची दखल घेऊन पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी घराची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. गावकर यांच्या घराची स्वखर्चाने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले असल्याचे माहिती आमदार राणे यांनी दिली. तर वरचावाडा येथील प्रेमा नाईक यांच्या घराला पावसाचा तडाखा बसला. त्यांचे सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती होंडा पंचायतीचे तलाठी संतोष गावस यांनी पंचनाम्यानंतर दिली.
चार हेक्टरसाठी १ लाख ६० हजार रुपये नुकसान भरपाई देणार : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पावसामुळे शेतीच्या झालेल्या हानीबद्दल खेद व्यक्त करुन सरकार प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पीक काढू शकले नाही आणि नुकसानी झाली त्यांना शेतकरी आधार निधी अंतर्गत प्रती हेक्टर ४० हजार रुपये याप्रमाणे चार हेक्टरसाठी १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत भरपाई येत्या डिसेंबरपर्यंत दिली जाईल, असे सावंत यांनी जाहीर केले आहे.