क्रिकेट मैदानावरच हृदयविकाराचा झटका, एकाचा दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 20:13 IST2024-01-21T20:13:40+5:302024-01-21T20:13:40+5:30

उपचार सुरू असताना डॉक्टरांनी रोहिदास यांना मृत घोषित केले. 

heart attack on the cricket field, the tragic end of one | क्रिकेट मैदानावरच हृदयविकाराचा झटका, एकाचा दुर्दैवी अंत

क्रिकेट मैदानावरच हृदयविकाराचा झटका, एकाचा दुर्दैवी अंत

माशेल :  खांडोळा येथील श्री शांतादुर्गा मैदानावर वाड्यावरील क्रिकेट लीग सामान खेळताना जाईडवाडा-खांडोळा येथील रोहिदास रघुवीर नाईक (वय ४९) यांचा दुर्दैवी अंत झाला. रविवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. क्रिकेट सामना खेळताना रोहिदास यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. सहकाऱ्यांनी त्यांना लगेच जवळच्या बेतकी आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना डॉक्टरांनी रोहिदास यांना मृत घोषित केले. 

उपलब्ध माहितीनुसार, रोहिदास हे एका खासगी आस्थापनेत चालक म्हणून कामाला होते. शनिवारी रात्री ते एका कार्यक्रमासाठी गेले होते. रविवारी पहाटे चारच्या सुमारास ते परतले. सकाळी ते स्थानिक लीग क्रिकेट सामन्यात सहभागी झाले. ते क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरले होते. सामना सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ते जमिनीवर कोसळताच सहकाऱ्यांनी उपचारासाठी धावाधाव केली. मात्र, ती व्यर्थ ठरली. 

रोहिदास नाईक हे मनमिळावू व्यक्तिमत्त्व होते. क्रिकेट, फुटबॉल खेळण्यासह ते चांगले नाट्य कलाकारही होते. ते उत्कृष्ट घुमट, समेळ वादन करायचे. त्यांचा लोकसंपर्कही दांडगा होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

Web Title: heart attack on the cricket field, the tragic end of one