कला-साधनेमुळेच वाढला आनंद निर्देशांक: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 07:59 IST2025-08-17T07:58:48+5:302025-08-17T07:59:48+5:30
पं. मनोहर बुवा शिरगावकर स्मृती राज्यस्तरीय भजन स्पर्धा उत्साहात

कला-साधनेमुळेच वाढला आनंद निर्देशांक: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कला आणि साधनेमुळे राज्याचा आनंद निर्देशांक वाढत आहे. भजनाच्या माध्यमातून गोमंतकीयांनी कलेचा आनंद मिळत आहे. त्यामुळेच आनंद निर्देशांक वाढत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
कला अकादमीच्यावतीने आयोजित पं. मनोहर शिरगावकर स्मृती राज्यस्तरीय भजन स्पर्धेच्या २०२५-२६ च्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, सरकार देखील राज्यात आनंद निर्देशांक वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. राज्यातील भजन संस्कृती टिकविण्यासाठी तसेच आताच्या पिढीने याकडे वळावे यासाठी आता शालेय पातळीवर संगीत शिक्षकांची नेमणूक केली आहे.
यात तबला, हार्मोनियम गायन अशा विविध कला शिकविल्या जात आहेत. राज्यात संत सोहिरोबानाथ आंबिये यांनी दिली भजनातून लोक जागृती केली. आताची पिढीही मोठ्या संख्येने भजन स्पर्धेत सहभागी होत आहे. या स्पर्धेमुळे एक महिना राज्यभर ग्रामीण भजनी कलाकार भजन करताना दिसतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
स्पर्धेचा निकाल...
या स्पर्धेत पुरुष गटात श्री सातेरी केळबाय कला आणि सांस्कृतिक मंडळ, लाडफे-डिचोली यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. द्वितीय पारितोषिक श्री दाडेश्वर कला केंद्र, नादोडा-बार्देश, तृतीय पारितोषिक दाडेश्वर मुळवीर कला व सांस्कृतिक मंडळ, विर्नोडा-पेडणे तर चौथे पारितोषिक श्री दादा महाराज भजनी मंडळ, बांदोडा-फोंडा यांना प्राप्त झाले. उत्तेजनार्थ पारितोषिके श्री शांतादुर्गा लक्ष्मी नृसिंह सांखळ्यो भजनी मंडळ, सांकवाळ आणि श्री विजयादुर्गा भजनी मंडळ, इंफाळ, प्रियोळ फोंडा यांना बक्षीस देण्यात आले.