आनंद निर्देशांक तपासणी सुरू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 12:44 IST2026-02-27T12:43:05+5:302026-02-27T12:44:04+5:30
साखळीत रंगला 'टी-विथ डॉ. प्रमोद सावंत' कार्यक्रम.

आनंद निर्देशांक तपासणी सुरू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: रवींद्र भवनमध्ये होणाऱ्या अनेक दर्जेदार कार्यक्रमांसाठी रसिकांकडून रवींद्र भवनचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार मानण्यासाठी 'टी विथ डॉ. प्रमोद सावंत' हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी रसिकांबरोबर दिलखुलास गप्पा मारल्या.
मागील दीड वर्षात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखालील नवीन संचालक मंडळाने सुरू ठेवलेल्या दर्जेदार व अनोख्या कार्यक्रमांची परंपरा पाहता या रवींद्र भवनमध्ये नियमित उपस्थिती लावणाऱ्या प्रेक्षकांकडून मुख्यमंत्री व रवींद्र भवन यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर एक बैठकीची मागणी केली होती. या मागणीला मान देऊन उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर व संचालक मंडळाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर उपस्थित होते.
राज्यात प्रथमच सरकारतर्फे लोकांच्या आनंदी जीवनाचे मोजमापन केले जात आहे. इतर कोणत्याही राज्यात हा उपक्रम हाती घेतला गेलेला नाही. रवींद्र भवनसारख्या कलेच्या भवनातून लोकांना सदैव आनंदी व प्रसन्न ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी बोलताना म्हणाले.
२०१४ साली सुरू झालेले साखळीतील हे रवींद्र भवन हे स्वच्छ व सुंदर तसेच योग्य नीगा राखून परिपूर्ण ठेवलेली वास्तू आहे. संपूर्ण गोव्यातील सरकारी अस्थापनांमध्ये साखळीतील रवींद्र भवनची वास्तू ही स्वच्छ व सुंदर वास्तू आहे.
या रवींद्र भवनला शेजारील राज्यांमधील लोकांचीही पसंती असून महाराष्ट्र कोकण भागातील तसेच बेळगावसारख्या भागातून काही कंपन्या, खासगी अस्थापने या रवींद्र भवनमध्ये आपल्या मोठ्या बैठका, परिषदा आयोजित करतात. त्यांना या रवींद्र भवनची भुरळ पडली आहे.
सरकारी वास्तू म्हणजे ती जनतेचीच वास्तू असते. येणाऱ्या प्रत्येक रसिक प्रेक्षकाने हे रवींद्र भवन ही आपली वास्तू आहे. ती सांभाळणे व स्वच्छ राखणे आपली जबाबदारी असल्याची भावना मनात जागृत केल्यास व्यवस्थापनाला अधिक मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सूत्रसंचालन राजेश वजरीकर यांनी केले. स्वागत उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर यांनी केले. यावेळी दया तेंडुलकर, मधुकर पाटणेकर, अंजली हळर्णकर, संतोष भगत, नरेश पेडणेकर, आश्विनी पटवर्धन, मयूर कंटक, नरेश दातये यांनी विचार मांडले.
लवकरच थिएटर सुविधा
रवींद्र भवनमध्ये अधिक मनोरंजनात्मक सोयी-सुविधांची मागणी लक्षात घेऊन लवकरच खुल्या सभागृहाच्या ठिकाणी दोन चित्रपट थिएटर, मुलांसाठी खेळ उद्यान, लहान पार्टी किंवा कार्यक्रमांसाठी सभागृह, लग्न सोहळ्यांसाठी प्रशस्त असा सुमारे ८०० आसन क्षमतेचा सभागृह, रेकॉर्डिंग स्टुडिओ तसेच रवींद्र भवनच्या वरील भागात केफेटेरिया सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.