हडफडे अग्निकांड: लुथरा बंधूंचे हस्तांतरण; बेकायदा बांधकामांची उच्च न्यायालयाकडून स्वेच्छा दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 09:48 IST2025-12-16T09:46:52+5:302025-12-16T09:48:01+5:30
लुथरा बंधुंना गोव्यात आणण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे एक पथक दिल्लीला रवाना झाले आहे.

हडफडे अग्निकांड: लुथरा बंधूंचे हस्तांतरण; बेकायदा बांधकामांची उच्च न्यायालयाकडून स्वेच्छा दखल
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : हडफडेतील बर्च बाय रोमियो लेन क्लबमधील आगीच्या दुर्घटनेतील संशयित, क्लबचे मालक सौरभ व गौरव लुथरा यांचे थायलंडकडून हस्तांतरण करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे लुथरा बंधुंना गोव्यात आणण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे एक पथक दिल्लीला रवाना झाले आहे.
केंद्रीय एजन्सींकडून लुथरा बंधूंना थायलंडकडून ताब्यात घेऊन औपचारिकपणे दिल्लीमध्ये गोवा पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लुथरा बंधूंना प्रथम दिल्लीला आणले जाईल आणि नंतर गोवा पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल. त्यानंतर संशयितांना २४ तासांच्या ट्रान्झिट रिमांडवर घेतले जाईल. यानुसार, लुथरा बंधुंना उद्या, रात्री उशिरा गोव्यात आणले जाईल, अशी अपेक्षा आहे. अग्निकांडाविषयी हणजूण पोलिस स्थानकात याविषयीचा गुन्हा नोंद आहे. तेथे त्यांची चौकशी केली जाईल.
सात जणांना अटक, तिघे निलंबित
गोवा पोलिसांनी अग्निकांड प्रकरणी आतापर्यंत सातजणांना अटक केली असून त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. यात क्लबचे व्यवस्थापक तसेच अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या क्लबच्या परवानगी प्रक्रियेदरम्यान अनियमितता, बेकायदेशीरपणाबाबत सरकारने तीन अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित केले आहे. या अधिकाऱ्यांसह ५० जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. तसेच न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फतही चौकशी सुरू आहे.
दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात बर्च बाय रोमीयो लेनच्या अनुषंगाने बेकायदेशीर बांधकामाबाबत खासगी याचिका प्रदीप घाडी आमोणकर व सुनील दिवकर यांनी दाखल केली होती. यात हडफडेतील अनधिकृत बांधकामे, किनारी नियमन क्षेत्राचे उल्लंघन, ऑक्युपन्सी प्रमाणपत्र नसताना बेकायदेशीर व्यावसायिक कामकाज करणाऱ्या आस्थापनांची तत्काळ तपासणीसाठी सूचना करणे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.
बेकायदा बांधकामांवर कारवाईची स्थानिक सस्थांची जबाबदारी
बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी ही स्थानिक संस्थांची आहे. मात्र, अशा बांधकामांना परवाने देण्यात, तसेच कारवाई करण्यात अधिकाऱ्यांनी, विशेषतः स्थानिक संस्थांनी ढिलाई दाखविली. या त्रुटींवरही न्यायालयाने बोट ठेवले आहे. स्वेच्छा दखल याचिकेप्रश्नी अॅड. रोहित ब्राझ डिसा यांची अॅमिक्युस क्यूरी म्हणून नेमणूक केली आहे. अशा प्रकरणांमध्ये अंतिम जबाबदारी कोणाची आहे हे निश्चित करण्यासाठी न्यायालयाने विशिष्ट कायदेशीर तरतुदी ओळखण्याचे आणि निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाने राज्य सरकारलाही बेकायदेशीर बांधकामांबाबत जबाबदारी निश्चित करण्यास सांगून म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
लुथरा बंधुंची लीगल टीम थायलंडमध्ये
हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन या क्लबचे मालक गौरव व सौरव लुथरा बंधूंची लीगल टीम थायलंड येथे दाखल झाली. या प्रक्रियेतून लुथरा बंधूंचे भारतात लगेच प्रत्यार्पण केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. क्लबमधील अग्निकांडानंतर दोघांनीही फुकेट-थायलंडला पलायन केले. त्यांना गुरुवार, दि. ११ रोजी थायलंडच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.
डॉक्युमेंट तसेच अन्य कायदेशीर मात्र त्यानंतर आवश्यक ट्रॅव्हल प्रक्रिया रखडल्याने त्यांना भारतात पाठवणे शक्य झाले नव्हते. मात्र, आता लुथरा बंधूंची लीगल टीम थायलंडमध्ये असून प्रत्यार्पण प्रक्रिया व आवश्यक कायदेशीर मदतीबाबत ते सुरक्षा यंत्रणेला सहकार्य करीत आहेत. ते पूर्ण होताच, दोघांना पुढील २४ ते ३० तासांत भारतात आणले जाईल, असे म्हटले जात आहे.
अग्निकांडामध्ये २५ जणांनी सहा डिसेंबर रोजी घडलेल्या या आपला जीव गमावला होता. गोव्यात आतापर्यंत घडलेली ही सर्वात मोठी आगीशी संबंधित दुर्घटना आहे. या घटनेनंतर लगेच रविवार दि. ७ रोजी पहाटे गौरव व सौरभ लुथरा यांनी थायलंडला पलायन केले होते. दोघांनाही लवकर भारतात आणले जावे यासाटी गोवा पोलिसांचे प्रयत्न आहेत.
अहवालास मुदतवाढ
'बर्च' क्लब आग दुर्घटना प्रकरणी न्यायदंडाधिकारी समितीला अहवाल सादर करण्यासाठी आठवडाभराची मुदत वाढवून देण्यात आली आहे. उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समितीला सरकारने चौकशी अहवाल सादर करण्यासाठी दिलेली मुदत सोमवारी संपली. आता आठ दिवस वाढवून मिळाले आहेत.
खंडपीठाकडून अॅमिकस क्युरी नियुक्त
हडफडेतील अग्निकांड दुर्घटनेच्या अनुषंगाने राज्यातील बेकायदा बांधकामांची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्वेच्छा दखल घेतली. अॅड. रोहित ब्राझ डिसा यांची अॅमिक्युस क्युरी म्हणून नेमणूक करण्यात आली. न्यायालयाने स्वेच्छा दखल याचिकेवरील पुढील सुनावणी ८ जानेवारीला ठेवली. अग्निकांड प्रकरणी दाखल केलेल्या खासगी याचिकेचे उच्च न्यायलयाने स्वेच्छा दखल याचिकेत रूपांतर केले. बेकायदेशीर व्यावसायिक बांधकामे ही या समस्येचे मूळ असल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदविले.
'द केप गोवा' रेस्टॉरंट सील
काब द राम, खोला-काणकोण येथे 'द केप गोवा' रेस्टॉरंटमध्ये संयुक्त समितीला तपासणीत अनेक अटींचे उल्लंघन आढळून आल्याने ते सील करण्यात आले आहे. कार्यकारी दंडाधिकारी तथा संयुक्त अंमलबजावणी समितीच्या अध्यक्षा माया पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने ही कारवाई केली. हडफडे येथील नाइट क्लब दुर्घटनेनंतर सरकारने नेमलेल्या समित्या राज्यात ठिकठिकाणी नाइट क्लब, तसेच इतर आस्थापनांना भेटी देऊन तपासणी करत आहे. पर्यटन खात्याने खासगी रॉक म्हणून परवानगी दिली होती. परंतु, येथे पूर्ण स्वरुपाचे रेस्टॉरंट चालवले जात होते.